गो… गो… गो… ‘गोविंदा’ नाही, तर गो ‘कोरोना’ गो! दहीहंडीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करू.

222

बोल… बोल… बजरंग बली की जय… तरुणांसाठी दहीहंडी हा आवडता उत्सव. अनेक वर्षे मुंबईत या उत्सवाची क्रेझ आहे. पण राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा फटका या उत्सवाला देखील बसला आहे. कोरोना संकटामुळे यंदाही या सणावर गदा येऊ शकते. सोमवारी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला हद्दपार करू, असे सांगत यंदाही राज्य सरकारची दहीहंडीला परवानगी मिळणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे 5 मागण्या केल्या.

(हेही वाचाः यंदा दहीहंडी होणार का? मुख्यमंत्री ठरवणार)

या आहेत गोविंदा पथकांच्या मागण्या

  1. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
  2. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविंदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
  3. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.
  4. कोविड-१९ संसर्गाची जाणीव ठेऊनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
  5. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळे घेतील.

(हेही वाचाः यंदा मनसे निर्बंधांची हंडी फोडणार!)

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

बाळगोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्यावर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत, त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लसीकरण केल्यानंतर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आले. मास्कमुक्त झालेल्या इस्त्रायलने तर पुन्हा मास्क वापरायला सुरवात केली आहे. अर्थचक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. अनेकांची हातावर पोटं आहेत, त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. गेल्या दीड वर्षांत आपण जी आरोग्य सेवा वाढवली, ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाही. आपण दुस-या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आहोत. पुन्हा ती काळरात्र नको. गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.