मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअपवर मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येईल,अशी धमकी शुक्रवारी रात्री देण्यात आली. यामुळे मुंबईत पुन्हा एकदा घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचबाबत मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेत जनतेला आश्वस्त केले आहे.
मुंबई आणि मुंबईकरांचे संरक्षण करणार
जो धमकीचा मेसेज आला आहे त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. त्यामुळे मुंबई आणि मुंबईकरांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही यासाठी आम्ही सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क करत आहोत, असे आश्वासन फणसळकर यांनी दिले आहे.
पाकिस्तानातून धमकी
ज्या नंबरवरुन हा मेसेज आला आहे तो पोकिस्तानातून आला असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. आम्ही याबाबत सखोल तपास करत आहोत. दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) आणि इतरही सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करत आम्ही यामागे कोणाचा हात आहे त्याचा शोध घेत आहोत. तसेच मुंबईच्या सुरक्षेबाबतही आम्ही सतर्क आहोत, असेही मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटले आहे.
धमकीचा मेसेज
शुक्रवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येणार असून त्यासाठी भारतातील 6 जणांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community