दस-याच्या दिवशी मुंबई आणि नवी मुंबईतील ‘या’ भागांत पावसाचा मारा

147

मुंबई व नजीकच्या परिसरात ऑक्टोबर हिटचा दाट सुरु असताना मुंबईत देवनार आणि नवी मुंबईतील वाशीनगर येथे पावसाने अचानक हजेरी लावली. बुधवारी दस-याच्या सणवारातही ऑक्टोबर हिटचा दाह सुरु असताना चेंबूर येथील देवनार येथे २९.९७ मिमी तर नवी मुंबईतील वाशी नगर परिसरात ५२.७ मिमी पाऊस झाला. तर नजीकच्या जुहू नगर परिसरात १३.६ मिमी पाऊस झाला.

सायंकाळी सहापासून गेल्या १२ तासांत या दोन्ही स्थानकांत झालेल्या पावसाच्या नोंदीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईत ब-याचशा भागांत पावसाची गैरहजेरी सुरु असताना देवनार आणि वाशीनगरमधील पावसाने सकाळपासून हजेरी लावली. सध्या मुंबई व नजीकच्या भागांत केवळ ढगाळ वातावरण दिसून येत आहे. दोन-तीन दिवसांपासून वाढत्या आर्द्रतेने केवळ घामांच्या धारांनी सर्वचजण हैराण झाले होते. महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऑक्टोबर हिटचा सर्वांना सामना करावा लागला होता.

( हेही वाचा: १११ साधूंचा शंखनाद, चांदीचे धनुष्य… शिंदे गटाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’ )

बुधवारी दक्षिण आणि मध्य मुंबईत अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी सुरु होत्या. घाटकोपर, चेंबूर आणि वडाळ्यात सकाळी हलक्या पावसाच्या सरी काही मिनिटांसाठी सुरु होत्या. एलफिस्टन रोड, भायखळा आणि मस्जिद बंदर परिसरातही हलक्या सरी अनुभवता आल्या. पश्चिम उपनगर परिसरांत पावसाची गैरहजेरी राहिल्याने सांताक्रुझ केंद्रात कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. कुलाब्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गुरुवारी, वातावरणात फारसा काही फरक दिसून येणार नाही. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. शहर व उपनगरांत हलका व मध्य स्वरुपाचा पाऊस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील, असाही अंदाज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.