महाराष्ट्राच्या ‘या’ तीन कन्यारत्नांना ‘नारी शक्ती पुरस्कार’!

165

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उत्सव, 1 मार्च पासून नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. या विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या 29 महिलांना 2020 आणि 2021 यावर्षांचे नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : International Women’s Day: महिला पोलिसांसाठी ‘ही’ अनोखी भेट )

‘नारी शक्ती पुरस्कार’

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये 2020 या वर्षासाठी दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे यांना आणि पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर वर्ष 2021 च्या सूचीमध्ये सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असून महिला सशक्तीकरण आणि विविध संबंधित क्षेत्रामध्ये कार्य करणा-या आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणा-या महिलांकडून लोकांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी पुरस्कारप्राप्त महिलांबरोबर आयोजित संवादात्मक सत्रामध्ये पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

29 महिलांना पुरस्कार

या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिले जातात. व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या असामान्य कार्याला पोहोचपावती म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, महिला ‘गेम चेंजर्स’ म्हणून अनेकदा भूमिका बजावतात, त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या पुरस्कारामुळे समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचीही समान भागीदारी आहे, हे अधिक स्पष्ट केले जात आहे. 2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवोन्मेषी उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएम आणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.