देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसतेय. तर मुंबईत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर ४ नोव्हेंबर ते रविवार ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस लसीकरण बंद राहणार आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
चार दिवस लसीकरण बंद
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर उद्या गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२१ ते रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सोमवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
(हेही वाचा-१२ लाख दिव्यांनी लख्ख झाली ‘रामनगरी’)
अद्याप मुंबईकरांचे लसीकरण अपूर्ण
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तर अद्याप सगळ्या मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण झाले नाही. मुंबईकरांनी कोरोना लस घ्यावी म्हणून पालिकेकडून अनेक मोहीम राबवून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून मुंबईत १०० टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर ‘फुल्ली वॅक्सिनेटेड’ असे फलक लावण्यात येणार असल्याचे जाहीरही करण्यात आले होते.