चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. आठवड्याभरात चंद्रपूरात चार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाघांनी केलेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी येथे झालेल्या हल्ल्यात सदाशिव उंदीरवाडे (७०) यांचा मृत्यू झाला.
काय घडला प्रकार?
ब्रह्मपुरी येथील कुडेसावली येथे शेतात वाघाचा सदाशिव उंदीरवाडे यांच्यावर हल्ला झाला. सदाशिव उंदीरवाडे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने सदाशिव उंदीरवाडे यांना जंगलात फरफडत नेल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत वनाधिका-यांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. याआधी हळदा येथे शेतात काम करणा-या रुक्मिणी म्हस्के या महिलेवर वाघाचा हल्ला झाला होता.
(हेही वाचा – ISRO ने रचला इतिहास, सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी)
या हल्ल्यात रुक्मिणी यांचा मृत्यू झाला. कुडसेवाली आणि हळदा येथील दोन्ही घटनामध्ये दुपारी शेतात गेलेल्यांवर वाघाचा हल्ला झाला होता. गेल्या आठवड्यात नागभिड, मूल येथेही वाघाच्या हल्ल्यात माणसांचा बळी गेला आहे. मूल येथे एकाचवेळी वाघाने दोन गुराख्यांवर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एकाही वाघाला जेरबंद करण्याबाबत वनविभागाने अद्यापही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
Join Our WhatsApp Community