पट्टेरी वाघाला खुणावतेय राधानगरी

कोल्हापूरातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात नुकतेच एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा वाघ सध्या राधानगरीत वास्तव्याला आला आहे. याबाबतची माहिती १७ एप्रिल रोजी राधानगरीतील जंगलात बसवलेल्या कॅमेरा ट्रेपमधून वनाधिका-यांना मिळाली. वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रेपमध्ये दिसून आल्यानंतर तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राधानगरीत वाघाचे दर्शन झाले.

२०१९नंतर आता झाले पट्टेरी वाघाचे दर्शन

आता हा वाघ कायमस्वरुपी राधानगरीतच स्थायिक होईल, यासाठी वनाधिका-यांनी कसोशीने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. याअगोदर राधानगरी ही दक्षिण कोकणाच्या मार्गातून, गोव्यातून थेट कर्नाटकातून येणा-या वाघांचा भ्रमणमार्ग मानला जात होता. आठवडाभर राधानगरीत वास्तव्य करणारा वाघ आता स्थानिकच होऊ देत, अशी आशा वन्यप्रेमी आणि वनाधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे. २०१९ सालानंतर राधानगरीत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती राधानगरीचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.

वाघासाठी पुरेसे भक्ष्य निर्माण करण्याची तयारी सुरु

हरिण केंद्र
राधानगरीत वाघांचा अधिवास निर्माण व्हावा, यासाठी नजीकच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातातील ८ हेक्टर जागेत हरिण केंद्र (डिअर ब्रिडिंग सेंटर) तयार केले जाईल. या केंद्रात पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालय, सोलापूर तसेच संगमेश्वरहून हरिण आणून सोडले जातील. २०२४ पर्यंत हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, प्रजननातून नव्याने जन्मलेल्या हरणांमुळे संख्या वाढेल, कालांतराने हरणे जंगलात सोडली जातील, जेणेकरुन वाघाला भक्ष्यासाठी हरिण उपलब्ध होईल.

कुरण विकास प्रकल्प
जंगलात स्वतंत्रपणे संचार करणा-या हरणांना पुरेसे खाद्य निर्माण होईल. त्यासाठी जंगल परिसरात कुरण विकास प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या गवताची लागवड केली जाते. हे गवत तृणभक्षक प्राणी आवडीने खातात.

विदर्भातील वाघही येणार राधानगरीत

विदर्भात वाढती वाघांची संख्या लक्षात घेत हे वाघ आता राज्यातील विविध भागांत वनविभाग स्थलांतरित करणार आहे. दोन वाघ आता नवेगाव नागझिरा येथे सोडले जातील. येत्या दोन वर्षांत वाघांसाठी आवश्यक भक्ष्यांची संख्या राधानगरीत तयार झाल्याची खातरजमा झाल्यानंतर विदर्भातील वाघ राधानगरीतही सोडले जातील, अशी माहिती राज्याचे वनविभागाचे प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली.

( हेही वाचा: माझा ‘मनसुख हिरेन’ करण्याचा सरकारचा तिसरा प्रयत्न फसला; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप )

हा वाघ नेमका कुठून आला, याचा मागोवा घेतला जात आहे. गोवा वनविभागाशीही राधानगरील आलेल्या वाघाबाबत बोलणे सुरु आहे. वाघ गोव्यातून आला आहे का, याबाबत शोध घेतला जाईल. राधानगरीच्या जवळच्या भागांत वाघांचे दर्शन होत असते परंतु वाघ आतापर्यंत कधीही वास्तव्यास आलेले नाहीत. या वाघाच्या दर्शनाने खूप आशा पल्लवित झाल्या आहेत. आम्हांला वाघाला राधानगरीत अधिवास उपलब्ध करुन द्यायचा आहे. त्यासाठीही कसोशीने प्रयत्न केले जातील. सुनील लिमये,  प्रधान मुख्य वनसंरक्षक , वनविभाग (वन्यजीव)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here