आतापर्यंत किती रिक्षाचालकांना मिळाले राज्य सरकारचे अनुदान?

परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले.

80

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले.

प्रत्येकी १५०० रुपये अनुदान

कोरोना निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना, एकूण १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले होते. राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे.
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून, ती २२ मे २०२१ पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरता खुली करण्यात आली आहे.

(हेही वाचाः १० वर्षांपासून मुंबईतील १०४ मराठी शाळांचे महापालिकेने रखडवले अनुदान! )

या संकेतस्थळावर मिळेल माहिती

आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा चालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ४० रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ लाख ५ हजार रिक्षा चालकांच्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळवण्यात आले आहे, असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. सदर प्रणालीची माहिती विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

असे दिले जाते अनुदान

ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी परवानाधारक रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असून, तो ज्या बँक खात्याशी जोडलेला आहे, त्याच खात्यामध्ये अनुदानाची रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येत आहे. रिक्षा परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरता व मोबाईल क्रमांकाची आधार क्रमांकाशी जोडणी करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये सुध्दा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचाः तृतीयपंथीयांनाही राज्य सरकार देणार 1500 रुपयांचे अनुदान?)

अनिल परब यांचे आवाहन

ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज दैनंदिन रित्या निकाली काढण्याकरता राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांमध्ये कर्मचारी/अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नागरी संपर्क केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सदर योजनेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. १८००१२०८०४० या टोल फ्री नंबरवर आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहेत. रिक्षा परवानाधारकांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित करावे आणि आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा, असे आवाहन मंत्री परब यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.