इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) च्या पुरवणी परीक्षेच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

लेखी परीक्षा पुढील प्रमाणे 

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) सर्वसामान्य विषय गुरुवार दिनांक 21 जुलै 2022 ते शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 पर्यंत.
  • इयत्ता 12 वी – व्यवसाय अभ्यासक्रम गुरुवार दिनांक 21 जुलै 2022 ते सोमवार दिनांक 08 ऑगस्ट 2022 पर्यंत.
  • माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा – बुधवार दिनांक 27 जुलै 2022 ते शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 पर्यंत.
  • इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 26 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार 20 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

वरील कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर 17 जून 2022 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच अन्य संकेतस्थळावरुन किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here