केईएममध्ये उतीपेशी बँक

परळ येथील केईएम रुग्णालयात अवयवदानाकरिता महत्त्वाची समजली जाणारी उत्तीपेशी (टिश्यू)बँक सुरु करण्यात आली आहे. अवयवदानासाठी कार्यरत असलेल्या दिल्ली येथील राष्ट्रीय अवयवदान प्रत्यारोपण संस्थेचे (नॉटो)संचालक डॉ. कृष्णन कुमार यांच्या हस्ते या उतीपेशी बँकेचे उद्घाटन गुरुवारी झाले. आरोग्य विभागाकडून परवाना मिळाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत ही बँक कार्यरत होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाकडून दिली गेली. उतीपेशी बँकेत नवजात बालकांच्या जन्मानंतर मातेच्या गर्भाशयातून निघणा-या एम्निओटीक मॅम्रेन (पातळ पडदा) या टाकाऊ समजल्या घटकाचेही संवर्धन केले जाईल.

( हेही वाचा : केंद्राकडून राज्याला नववर्षाचे गिफ्ट! विविध योजनांसाठी ५०० कोटी मंजूर)

माणसाच्या शरीरातील हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया तसेच प्लास्टीक सर्जरीशी संबंधित शस्रक्रियांमध्ये आवश्यक उतीपेशींना या बँकेतून संवर्धित केले जाणार आहे. गरजेच्या शस्रक्रियांच्यावेळी या बँकेतून उतीपेशी वापरल्या जातील. ही सुविधा टाटानंतर आता केईएम रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, मुंबईच्या अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस के माथुर, प्लास्टीक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी, नोटो संस्थेखालोखाल कार्यरत असणारा रॉटो-सॉटो (पश्चिम) या अवयवदान समितीच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन, पोटविकारतज्ज्ञ डॉ. अभय शुक्ला तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. अवयवदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच अवयवदानाच्या चळवळीला हातभार लागावा म्हणून केईएम रुग्णालयात सुरु झालेली उतीपेशी बँक रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास नॉटो या संस्थेचे संचालक डॉ. कृष्णनन कुमार यांनी व्यक्त केला.

शस्त्रक्रिया तसेच औषध निर्मितीसाठी बाळाच्या जन्मानंतर मातेच्या गर्भाशयातून निघणा-या एम्निओटीक मॅम्रेनला वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. पातळ पडद्याचे निर्जंतुकीकरण करुन शस्त्रक्रिया झालेला भाग तसेच जखमांवर लावल्यास रुग्ण बरे होण्याची प्रक्रिया सुलभ होते. शस्त्रक्रियमध्ये रक्तासह कित्येकदा उतीपेशीचीही माणसाच्या शरीराला गरज असते. शरीरातील हे दोन महत्त्वाचे घटक आता बँकेच्या माध्यमातून संवर्धित केले जाणार असल्याने केईएममध्ये रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल, अशी प्रतिक्रिया केईएमच्या डॉक्टरांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here