नागपूरमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. दररोज हे संख्या वाढत चालल्याने आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे नागपुरात जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. तहसील आणि गांधीबाग येथील व्यापाऱ्यांनी या लॉक डाऊनच्या विरोधात हे आंदोलन सुरू केले. त्यावेळी हजारो व्यापाऱ्यांनी रस्त्यावर गर्दी करून कोरोनाच्या नियमांची ‘ऐशी तैशी’ केली. गर्दीला आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आली.
पनवेलमध्येही व्यापाऱ्यांचे आंदोलन!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महिनाभर कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. याविरोधात व्यापारी, दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. खारघर वसाहतीत संतप्त दुकानदारांनी पोलिसांची गाडी अडवली. तर कळंबोलीत प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून निर्बंधाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्नही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही नियमही पाळू पण आमच्या पोटावर लाथ मारू नका. खारघरमध्ये पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रू माळी यांनी व्यापाऱ्यांना विनंती केली, त्यानंतर गर्दी कमी झाली.
(हेही वाचा : कोरोना : बेफिकीरी आणि निष्काळजीपणा!)
Join Our WhatsApp Community