कोकणात जाताना टोल भरू नका, कारण…

या सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना तातडीने स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

169

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून, कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना तातडीने स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

दोन दिवसांत खड्डे बुजवा

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

(हेही वाचाः दादरचा बाजार फुलला, पण…)

गणेशभक्तांसाठी विशेष मार्गिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना टोलमध्ये सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील टोल नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने टोल नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेश भक्तांच्या सेवेसाठी

टोल नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका, टोल सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर टोल नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

(हेही वाचाः तिसरी लाट थोपवायची की तिला आमंत्रण द्यायचे… काय म्हणाले मुख्यमंत्री?)

कोकणात जाणाऱ्या मार्गांवर पोलिस तैनात

कोकणात जाणाऱ्या मार्गांवर स्थानिक पोलिसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले असून, भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.