गेली दोन वर्ष टोमॅटो या पिकाला बाजारभाव न मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व टोमॅटो मार्केट फुल्ल असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतक-याला टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर असे या शेतक-याचे नाव आहे.
जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती. यांची या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांनी यंदाच्या वर्षी लागवड केली आहे. तुकाराम गायकर यांचा मुलगा ईश्वर आणि त्यांची सून सोनाली या शेतात काम करतात. दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.
(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग )
टोमॅटो विक्रीसाठी त्यांना जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो कॅरेट विक्री केले असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० कॅरेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८ लाख रुपये मिळाले आहेत. असा विचार करून त्यांना मागच्या महिनाभरात त्यांच्या क्रेटला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. यामुळे महिनाभरात बाजार समितीचे जवळपास ८० कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे.
यंदाच्या वर्षी अनेक शेतक-यांना टोमॅटोमुळे लॉटरीच लागली आहे. यामुळे १३ ते १४ शेतकरी हे करोडपती आणि अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. यंदाच्या वर्षी टोमॅटोने शेतक-यांना तारले आहे. चांगल्या टोमॅटोला नारायणगाव मार्केट येथे सर्वांत उच्चांकी म्हणाजे २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.
यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत, तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसलेच पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी तीन ते चार महिन्यांच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे ईश्वर गायकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community