देशभरात सर्वाधिक डाळींचे पीक मध्य भारतात घेतले जाते. मध्य प्रदेश महाराष्ट्राला लागून असलेला दक्षिण भाग विदर्भातील प्रदेशाचा यात समावेश होतो. विदर्भात अकोला, यवतमाळ आणि मराठवाड्यातील लातूर येथे मोठ्या प्रमाणात तूरडाळ तयार होते. हरभरा डाळही सर्वाधिक विदर्भ आणि राजस्थानच्या काही भागात तयार होते. यंदा देशभरात तूरडाळीचे उत्पादन ३ लाख टनांनी कमी झाले आहे. याबाबत नॅशनल बल्क हॅंडलिंग कॉर्पोरेशनने आकडेवारी दिली आहे.
( हेही वाचा : दिवाळीत जाणार 597 नर्सेसची नोकरी; सेवा समाप्तीचे सहसंचालकांचे आदेश)
तूरडाळीचे उत्पादन घटले
राज्यातील पावसाचा फटका तूरडाळीला बसला आहे. तूरीचे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. दिवाळीनंतर नवी तूरडाळ बाजारात येते. यंहा मात्र हे उत्पादन कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील तूर उत्पादकता अनुक्रमे ३ ते ४ टक्क्यांनी घटली आहे. मध्य प्रदेशात तूरीचे पीक चांगले आल्याने देशभरातील परिस्थिती सकारात्मक आहे.
सणासुदीत डाळींच्या किमती वाढल्या
सर्व डाळी मिळून भारताची वार्षिक मागणी जवळपास १२२ लाख टन इतकी असते. त्यामध्ये सर्वाधिक ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीचा समावेश असतो. यंदा तूरडाळीला पावसाचा फटका बसला आहे. सर्वाधिक पीकघट महाराष्ट्रात असल्याने येत्या काही काळात तूरडाळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचे बाजारातील दर हे 110 रुपये प्रति किलो आहेत. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळी आधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.