पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा स्तर वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील पर्यटन बंदी अद्याप प्रशासनाकडून कायम ठेवली आहे, तरीदेखील पर्यटक पर्यटन स्थळावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या पर्यटन स्थळावर कारवाई करत पोलिसांकडून 1 जून ते आजतागायत तब्बल दहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे . तरीदेखील पोलिसांच्या कारवाईला न जुमानता पर्यटक पर्यटनस्थळावर दाखल होत आहेत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोकादायक पद्धतीने पर्यटनही करत आहेत.
पर्यटन स्थळावर जीवघेणा सेल्फी खेळ
मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी असलेले प्रसिद्ध असे रांजणखळगे पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करू लागले आहेत. तळेगाव पोलिस ठाणे, तसेच तळेगाव एमआयडीसी पोलिस या पोलिसांच्या असलेल्या हद्दीच्या वादामुळे पर्यटकांचे चांगलेच फावते आहे. धोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्यासाठी स्टंट करताना अनेक पर्यटकांचा या पर्यटन स्थळावर मृत्यू झालेला आहे. प्रशासनाकडून धोकादायक पद्धतीने पर्यटन करण्यास मनाई करण्याबाबत सूचना फलक लावले असतानासुद्धा अनेक पर्यटक आपल्या जिवावर बेतेल, अशा प्रकारचे स्टंट करताना या पर्यटनस्थळावर पाहायला मिळत आहे. कुंडमळा येथे रांजण खळगे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. परंतु, ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत तरुण, तरुणीं जीवघेणा सेल्फी काढत असून जीव धोक्यात घालत आहेत. दरम्यान, अनेक पालक आपल्या मुलाला घेऊन रांजण खळगे पाहण्यासाठी नदीच्या कडे बसलेले असतात. तर, काही तरुण मंडळी आपल्या मैत्रिणीसोबत थेट पाण्यात जाऊन खेळत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच दुर्लक्ष होत आहे. लोणावळ्यातील टायगर, लायन्स पॉईंट येथे देखील पर्यटक हुल्लडबाजी करत अनेकांचे जीव सेल्फी च्या मोहापायी गेले आहेत. हे नाकारता येत नाही.
(हेही वाचा : प्रदीप शर्मासह संतोष शेलार, आनंद जाधवला न्यायालयीन कोठडी)
अतिउत्साही पर्यटकांकडून नियमांच उल्लंघन
लोणावळा, मावळ या परिसरात मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे धबधबे आणि नद्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यटकांची ओढ या दिशेने लागली आहे. कोरोना नियम धुडकावून पर्यटक फिरत असल्याचे चित्र असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिस बघ्यांची भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे मावळ परिसरात असणाऱ्या कुंडमळा येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असून येथील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यासोबत सेल्फी काढत असल्याचे चित्र आहे. परंतु, हे त्यांच्या जीवावर बेतू शकते.
Join Our WhatsApp Community