नॅशनल पार्कात पिंज-यात डांबलेल्या प्राण्यांसाठी आता मोजा १३१ रुपये

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कित्येक वर्ष पिंज-यांच्या नुतनीकरणाच्या नावाखाली सफारीचा बनावट प्रकार करुन पर्यटकांना लुबाडले जात आहे. सफारी ही मूळ संकल्पना मुक्त प्राण्यांना हिंडताना दाखवण्यासाठी वनविभागाने महसूल उत्पन्नासाठी सुरु केली आहे. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात थेट पिंज-यात (पर्यायी पिंज-यात) बंद झालेले वाघ आणि सिंह पाहण्यासाठी आतानव्या वर्षापासून पर्यटकांना १३१ रुपये मोजावे लागणार आहे.

उद्यान प्रशासनाकडे तीन मादी आणि दोन नर वाघ

दर वर्षाला दहा टक्के वाढीव दर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आकारला जातो. प्रवेश फीपासून ते बोटसेवा, सफारी आदी पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी पैसे आकारणी वाढवली जाते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे व्याघ्र आणि सिंह सफारी हे प्रमुख आकर्षण मानले जाते. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस व्याघ्र सफारीच्या पिंज-यांच्या दुरूस्तीचेही पुन्हा काम सुरु केले असल्याची माहिती उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी मल्लिकार्जून यांनी दिली. त्यामुळे सिंहापाठोपाठ वाघही पर्यायी पिंज-यातच पहावे लागत आहे. त्यातही वाघ इतर भागांतून प्रजननासाठी आणण्याचा हेतूही असफल होत आहे. सध्या उद्यान प्रशासनाकडे तीन मादी आणि दोन नर वाघ आहेत. परंतु या वाघांमध्ये मिलन सफल झालेले नाही. चार वर्षांपूर्वी नागपुरातून आणलेल्या बिजली वाघीणीला नव्वद दिवस उलटूनही प्रसूती झाली नाही, अखेर ती ‘स्थूल’ झाल्याचा निष्कर्ष उद्यान प्रशासनाने मांडला. बिजली वाघीणी गरोदर असल्याचे समजून उद्यानात पेढेही वाटण्यात आले होते.

(हेही वाचा नॅशनल पार्कची सिंह सफारी बंद होण्याच्या मार्गावर! काय आहे नेमके कारण?)

निरोगी वाघांची जोडी उद्यानात आणून उद्यानाला नवे वाघ मिळू शकतात

भविष्यात वाघांची संख्या वाढवायची असेल तर शारीरिकदृष्टया निरोगी वाघांची जोडी उद्यानात आणून उद्यानाला नवे वाघ मिळू शकतात, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली. २०११ सालापासून उद्यानात एकाही नव्या वाघ किंवा सिंहाचा जन्म झालेला नाही. वाघाटी प्रजनन केंद्र सुरु करण्यासाठीही वाघाटीही पुरेसे नाही आहेत. त्यामुळे नवा प्राणी आणण्यासाठी नेमका कोणता पर्यायी प्राणी द्यायचा हा मोठा यक्ष प्रश्न उद्यान प्रशासनासमोर आ वासून उभा आहे. वेळीच नवे प्राणी मिळाले नाहीत, तर सिंहापाठोपाठ व्याघ्र सफारीही बंद करण्याची नामुष्की उद्यान प्रशासनावर ओढावेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here