दादर पश्चिमेत वाहतूक आणि महापालिकेचा दुर्लक्ष: शेअर टॅक्सी अडवतात बेस्ट बसचा मार्ग

168

दादर पश्चिम रेल्वे स्थानकापासून ते वरळी कोळीवाडापर्यंत जनतेसाठी बेस्ट बस सेवा सुरु करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दादरचे शेवटचे स्थानक गाठताना बस चालकांची मोठी दमछाक होत आहे. दादरच्या कबुतर खान्यापासून रेल्वे स्थानकापर्यंतच्या मार्गांवर फेरीवाले आणि शेअर टॅक्सी यातून मार्ग काढत जाताना बस चालकांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे शेअर टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे बसला मार्गच मिळत नसून बऱ्याचदा उर्मट शेअर टॅक्सी चालक हे आपल्या नंबरप्रमाणे गाडी लावताना रस्त्याची जागाही सोडत नसताना कबुतर खान्याचा वळसा घेताना बस चालकांला चक्क थांबा घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. परिणामी यामुळे भवानी शंकर मार्ग आणि स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. परंतु टॅक्सी चालकांच्या या मनमानी वर्तनामुळे बसचा अपघात संभावण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

दादर  पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या एन.सी. केळकर मार्गावर (कबुतर खान्याकडे जाणारा रस्ता) केशवसूत उड्डाणपूलाजवळून वरळी कोळीवाड्यात जाणारी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग लागते. फेरीवाले आणि यासाठी खरेदीसाठी होणारी गर्दी यातून मार्ग काढत बसच्या प्रवासासाठी प्रवाशी रांगेत उभे राहत असले तरी बसमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना किमान अर्धातास प्रतीक्षा करावी लागत आहे. याठिकाणी एका मागून एक बस उभ्या असल्या तरी पहिल्या बसला फिरवून घेताना होणाऱ्या विलंबामुळे मागील बसला पुढे येता येत नाही. परिणामी बसची रांग एकमागून एक एक अशी लागते.

( हेही वाचा: मुंबई-नागपूर महामार्ग ‘समृध्दी’ आणणार! काय आहेत वैशिष्ट्ये? तरूणांना रोजगाराची संधी )

केशवसूत उड्डाणपुलाच्याजवळ बस जिथे फिरवून घेतली जाते तिथून श्री सिध्दीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या शेअर टॅक्सी उभ्या असतात. त्यामुळे बसला गर्दी आणि या शेअर टॅक्सीमधून मार्ग काढताना अनेक अडचणींमधून जावे लागत आहे. एकाबाजूला ही समस्या आहे तर दुसरीकडे भवानी शंकर मार्गावरून येणाऱ्या बसेस कबुतर खान्याला वळसा मारुन स्टेशनच्या दिशेला येतात. परंतु कबुतर खान्याजवळील चौकांमध्ये वरळीला जाणाऱ्या  शेअर टॅक्सी उभ्या असल्याने बसला वळसा मारण्यात अडचणी येतात. या शेअर टॅक्सीमुळे बसला पुढे जाता येत नसल्याने, सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होतेच. शिवाय यातून मार्ग काढताना अपघात होण्याचीही दाट शक्यता असल्याने बस चालकांला याठिकाणी मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. मात्र, बस सेवा सुरु केली असली तरी तेथील शेअर टॅक्सी चालकांना कोणत्याही प्रकारची शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत किंवा फेरीवाल्यांना या मार्गावरुन हटवण्यात महापालिकेला काही करता येत नाही. त्यामुळे भविष्यात याठिकाणी बेस्ट बसमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.