गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदुर्ग राष्ट्रीय महामार्गावर वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवाससाठी २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासकरीता २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते २९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी राहील.
तसेच १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या वेळेत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित वाहतूक करतील.
(हेही वाचा – Ladakh : लडाखमधील एक इंच भूमी चीनच्या ताब्यात नाही; निवृत्त ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी राहुल गांधींना दिले उत्तर)
‘या’ वाहनांना वगळले
- दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.
- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने–आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलिसांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.
- कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्यास्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा.
- तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात–निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरीता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community