कुर्ला येथे एका वाहतूक पोलिसावर जीवघेणा प्रसंग ओढवला होता. एका कार चालकाने वाहतूक पोलीस (Traffic Police) हवालदाराच्या अंगावर कार चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या जीवघेण्या प्रसंगात पोलिस हवालदार सुदैवाने बचावले असले तरी त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मुंबईत वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याची या वर्षातील २९वी घटना आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये यावर्षी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये मुंबईत वाहतूक पोलिसांवर हल्ल्याच्या १९ घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यावर्षी १ जानेवारी ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २९ गुन्ह्याची नोंद मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहतूक पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यामुळे वाहतूक पोलीस विभागात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांवर (Traffic Police) होणारे हल्ले तात्काळ स्वरूपाचे असतात, मुंबई वाहतूक पोलिसांवर होणारे हल्ल्याची संख्या दक्षिण मुंबई, उत्तर आणि पूर्व उपनगरात मोठी आहे. वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये होणारे वाद हे बहुतांश नो पार्किंगमधून वाहन उचलने, सिग्नल तोडणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे यातून होत असतात, वाहतूक पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून अनेक वाहन चालक पोलिसांसोबत वाद घालून वेळ प्रसंगी पोलिसांवर हात उचलतात असे एका वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने हिंदुस्थान पोस्ट सोबत बोलतांना सांगितले.
(हेही वाचा Central Railway Megablock : जाणून घ्या मध्य रेल्वेवर कुठे – कुठे असणार ‘ब्लॉक’)
वाहतूक पोलिसांवर होणारे काही हल्ले जीवघेणे ठरले आहे, तर अनेक घटनांमध्ये वाहतूक पोलिस गंभीर जखमी झालेले आहे. अशीच एक घटना २०१६ मध्ये खार येथे घडली होती एका २४ वर्षीय व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन भावासह कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्यावर हल्ला केला, शिंदे यांना दोन्ही भावांनी लाठ्या काठ्याने मारहाण केल्यामुळे शिंदे यांचा या हल्ल्यात मृत्यु झाला होता. शिंदे यांनी हल्लेखोर दोन्ही भावांपैकी अल्पवयीन असलेल्या हल्लेखोराला विना हेल्मेट वाहन चालवत असताना अडवून त्याच्यावर कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
अनेक घटनांमध्ये वाहतूक पोलिसाकडून (Traffic Police) तपासणी दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनांना थांबविण्यासाठी धावत्या वाहनाच्या समोर उभे राहतात, कारवाईच्या भीतीने वाहन चालक वाहन न थांबवता वाहन थेट पोलिसांच्या अंगावर चढवतात, त्यात वाहतूक पोलीस जखमी होण्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. सह पोलिस आयुक्त (वाहतूक) प्रवीणकुमार पडवळ म्हणाले, “अशा गुन्हेगारांवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ३३२ (शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे) या कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो, या गुन्ह्यात आरोपीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते.” वाहतूक विभागातील आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या वर्षी नोंदवलेल्या याप्रकारच्या घटनांची संख्या २९ आहे, परंतु छोटे मोठे शाब्दिक गैरवर्तनाच्या अनेक किरकोळ घटना घडतात मात्र त्याची नोंद होत नाही.
बोरिवली येथे तैनात असलेल्या एका वाहतूक हवालदाराने सांगितले, “प्रत्येक वाहतूक पोलिसाला मारहाण होण्याचा धोका असतो. आपण सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अनेकांना त्यांच्या चुकांची जाणीव होते आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी दंड भरतात पण असे लोक आहेत जे त्यांना थांबवल्याबद्दल अनेकदा तोंडी शिवीगाळ करतात. काही जण तर शक्तिशाली लोकांशी किंवा राजकारण्यांशी असलेल्या संबंधांबद्दल बढाई मारून आम्हाला धमकावतात. त्यांना समजत नाही की नियम त्यांच्या तसेच रस्त्यावरील इतरांच्या सुरक्षेसाठी बनवले जातात.”
Join Our WhatsApp Community