कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना गाडीच्या बोनेटवर बसवून मुजोर चालकाने त्यांना वेगाने फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीच्या गुरुवारी आझाद नगर परिसरात घडला आहे. यात सदैवाने ट्रॅफिक पोलिसांच्या जीव वाचला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय झाले नेमके?
ट्रॅफिक पोलिस विजयसिंह गुरव हे गुरुवार 30 सप्टेंबर रोजी दुपारी आझाद नगर मेट्रो स्टोशनच्या खाली असलेल्या जे.पी.रोड येथे आपली ड्युटी करत होते. दुपारी 12च्या सुमारास एक काळ्या रंगाची ह्युंडाई क्रेटा कार चुकीच्या लेनमधून जात असल्याचे ट्रॅफिक पोलिस विजयसिंह गुरव यांना आढळून आले.
चालकाची मुजोरी
त्यावेळी गुरव यांनी त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा या कार चालकाने एक आयडी कार्ड दाखवले व आपण प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असल्याचे सांगत त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच गुरव यांनी गाडीच्या बोनेटवर बसून चालकाला बाहेर येण्यास सांगितले. मात्र मुजोर चालकाने न ऐकता गुरव यांना बोनेटवर बसवूनच वेगाने गाडी पुढे नेली. मात्र पुढे रस्ता नसल्याने त्याने गाडी थांबवली व त्यामुळे विजयसिंह गुरव यांचे प्राण वाचले.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी जीवितास धोका निर्माण करण्यासाठी आणि सार्वजनिक कर्तव्यात अडसर निर्माण करण्यासाठी क्रेटा कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध डी.जी. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती डी.जी. नगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिफलगार यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community