रेल्वे गाड्यांचे नंबर बदलले, प्रवाशांचे धाबे दणाणले

कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे, सर्व व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहे, हे लक्षात घेऊन आता रेल्वेनेही देशभरातील सर्व सेवा संपूर्णपणे पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. नुसतीच सेवा पूर्ववत केली नाही, तर लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांचे बदलले नंबरही रेल्वेने पूर्ववत केले आहेत. मात्र त्यामुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.

गाड्यांच्या नंबरसमोरील ‘शून्य’ काढला

भारतीय रेल्वेने कोविड पूर्व काळात चालवल्या जात असलेल्या सर्व गाड्या पुन्हा त्याच पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गाड्यांचे वेळापत्रकदेखील पाहिल्याप्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड काळात रेल्वेने बऱ्याच गाड्या बंद केल्या होत्या, त्यामुळे सुरु असलेल्या गाड्यांचे नंबर बदलले होते, ते नंबर ‘शून्य’ अंकाने सुरु होत होते. मात्र आता रेल्वेने हे नंबरही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरसमोरील ‘शून्य’ काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच सर्व गाड्यांचे नंबर बदलले आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांना धक्का! मेट्रो कारशेड रखडणार! काय म्हणाले उच्च न्यायालय?)

नवीन नंबर जाणून घेण्यासाठी धावपळ 

त्यामुळे पूर्वीचे नंबर ठाऊक नसल्याने प्रवाशांची गोची होत आहे. तसेच ज्या प्रवाशांनी जुन्या गाडीच्या नंबरने आरक्षण केले आहे. आता त्यांची त्यांच्या गाडीचा नंबर काय आहे, हे शोधण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. यासाठी रेल्वेने आता रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेद्वारे याविषयीची माहिती प्रवाशांना देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांच्या गाडीचा नंबर तिकीट घराकडे जाऊन जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र ज्यांना याबाबत काहीच माहिती नसेल, त्या प्रवाशांची ऐनवेळी तारांबळ उडणार आहे. त्यामुळे याविषयी रेल्वेने तातडीने सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here