कोविड वॉर्डामध्ये रूपांतरित केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा यार्डात!

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने या गाडीची आवश्यकता नसल्याचे पत्र पश्चिम रेल्वेला पाठविले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने काही जिल्ह्यांमध्ये रुग्णालये अपुरे पडू लागली, त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबईसह पालघर, नंदुरबार व राज्यातील काही भागांत रेल्वेच्या डब्यांचे विलगीकरण डब्यात रूपांतर केले. परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात एकही रुग्ण या विलगीकरण डब्यात उपचार घेत नसल्याने सरकारच्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने पालघर, नंदुरबार स्थानकातून हे डबे तेथून हटवण्यात आले. पालघर स्थानकातील विलगीकरण गाडी गुजरात राज्यातील वलसाड कारशेडमध्ये उभी करण्यात आली.

विलगीकरण कक्ष रिकामेच राहिले!

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षीपासून रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे विलगीकरण कक्षात रूपांतरित केले होते, मात्र मागील वर्षापासून आतापर्यंत या डब्यांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे या विलगीकरण कक्षांचे मध्य रेल्वेने पुन्हा एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये रूपांतरीत केले. मध्य रेल्वेने ४८२ पैकी ४८ डबेच विलगीकरणाचे तयार ठेवले व ते मुंबईबाहेर उपलब्ध करून दिले. पश्चिम रेल्वेने ३८६ पैकी १२८ डबे मुंबई विभागासाठी सज्ज ठेवले आहेत. परंतु त्यांचा वापर करण्याबाबत राज्य सरकार व  महापालिकांचा विचार झालेला नाही.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालघर, नंदुरबारमधील स्थानिक प्रशासनाने या गाड्यांची गरज नसल्याचे रेल्वेला कळविले. त्यानुसार पालघरमधील गाडी वलसाडला पाठवली, तर नंदुरबारमधील रेल्वेगाडीतही उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात स्थलांतरित केले आहे.
– सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

राज्य सरकारनेच रेल्वेला पाठवले पत्र!

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नंदुरबार रेल्वे स्थानकात १८ एप्रिल २०२१ पासून २१ विलगीकरण डब्यांची गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. ५ मे २०२१ पासून २१ विलगीकरण डबे पालघर रेल्वे स्थानकातही उभे करण्यात आले होते. तर नागपूर स्थानकातही ११ विलगीकरण डबे तयार ठेवले होते. पालघर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर विलगीकरण डब्यांच्या गाडीत तीन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने या गाडीची आवश्यकता नसल्याचे पत्र पश्चिम रेल्वेला पाठविले आहे. त्यानुसार ही गाडी पालघर स्थानकातून वलसाडला नेण्यात आली. नंदुरबार स्थानकात विलगीकरण डब्यांची गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत १०५ कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून येथे उपचार घेणाऱ्या २७ रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांना घरी पाठविण्यात आले, तर उपचाराची गरज असलेल्या काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

(हेही वाचा : केंद्रीय शिक्षण मंडळाची १२वीचीही परीक्षा रद्द! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here