BMC : ट्रॉमा केअर रुग्णालयातील डॉक्टरांसह २२ रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या

1615

मुंबई महापालिकेच्या (BMC) जोगेश्वरीतील हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयातील (Trauma Care Hospital) आयसीयू सेवांसाठी नेमलेल्या खासगी संस्थेने काम बंद केल्यामुळे महापालिका प्रशसनाची प्रचंड नालस्ती तसेच बदनामी झाली होती. या घटनेला वैद्यकीय विभाग जबाबदार असताना खासगी संस्थेवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने येथील सर्वच डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची बदलीच केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला या रुग्णालयात वैद्यकीय सेवा द्यायची आहे की केवळ राजकारणच खेळायचे आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – BMC च्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून ५४० उमेदवारांना नोकरीची संधी)

मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आयसीयूची सेवा ही बाह्य खासगी संस्थेमार्फत केली जाते. या खासगी संस्थेमार्फतच डॉक्टरांसह नर्सेस व इतरांची सेवा या आयसीयूसाठी घेतली जाते. परंतु मागील दहा दिवसांपूर्वी या रुग्णालयातील आयसीयू सेवाच बंद केली. त्यानंतर ही खासगी सेवा देणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी झाली आहे. परंतु अद्यापही या संस्थेवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. उलट येथील सर्व डॉक्टर तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून या रुग्णालयातील तब्बल २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

महापालिकेने एकप्रकारे येथील नर्सेस वगळता सर्वांचीच बदल्या केल्या. परंतु या बदल्या करून याठिकाणी अन्य रुग्णालयातील तसेच दवाखान्यांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्णी लावताना त्यांचे निवासस्थान कुठे याची साधीही माहिती घेतली नाही. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी तसेच तंत्रज्ञ हे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पोहोचण्यासाठी अधिक तासांचा अवधी प्रवासांमध्ये घालवावा लागणार असून असे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात किती सेवा देतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या रुग्णालयातील डॉक्टर अणि तंत्रज्ञ यांच्याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी तसेच जनतेच्या तक्रारी यत असल्याने या सर्वांच्या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात बदल्या केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या बाबत तक्रारी आल्याने याबाबतची तक्रारींचे निरसन करण्याच्या दृष्टीने यासर्वांच्या बदल्या केल्या आहे.  या रुग्णालयात नवीन कर्मचारी वर्ग हवा होता, त्यानुसार बदल केला आहे. या बदल्या करताना जी यादी सादर केली होती, त्याला मंजुरी दिली. यात कुणी लांब तर कुणी जवळ राहणारे असू शकतील,असे त्यांनी स्पष्ट केले.

या रुग्णालयात खासगी संस्थेने आयसीयूची (ICU) सेवा बंद केल्यामुळे याविरोधात भाजपाचे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी नाराजी व्यक्त करत याठिकाणी केईएम (KEM), शीव आणि नायरसह कुपरप्रमाणेच स्वत:च्या डॉक्टरांच्या मदतीने आयसीयू सेवा दिली जावी अशी मागणी केली होती. याबाबत पंकज यादव यांना विचारले असता त्यांनी आपण कधीही येथील सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली नव्हती. जर बदली करायची होती तर टप्प्याटप्प्याने येथील डॉक्टरांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायला हव्या होत्या, एकदम सर्वांच्या बदल्या करणे योग्य नाही. तसेच या बदल्या करताना कुठलाही वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयीन कर्मचारी हा रुग्णालयापासून जवळच्या अंतरावरच राहणार असावा. तो लांब राहणार असेल तर त्यांचा अर्धा वेळ प्रवासात जाणार असेल तर तो थकला भागलेला डॉक्टर रुग्णांना काय सेवा देणार असा सवालही त्यांनी केला आहे. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.