बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडीत ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने साधली आहे. या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान (Palm Garden) तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान (Scented Garden) ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरु करण्यात आली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसून बाजूने जात असलेल्या नाल्यातील प्रवाहामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना करावा लागतो, तिथे या सुवासिक फुलांच्या बगीच्याने सुगंधित वातावरण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे रस्त्याने विभागलेल्या या दोन्ही उद्यानांची नावे स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अशी असून हयात असेपर्यंत दोघांची मैत्री अजरामर होती, आज आजही या उद्यानांच्या माध्यमातून दोघांची मैत्री चिरंतन असल्याचे दिसून येते.
दोन्ही उद्यानांमध्ये दररोज किमान १ हजारांहून अधिक आबालवृद्ध येतात!
बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३ मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरुपाची व काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नाला देखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही उद्यानांची निर्मिती झाली आहे. जॉगिंग ट्रॅक, विविध प्रकारचे व्यायामाचे साहित्य, निवांत बसून संवाद साधण्यासाठी ठिकठिकाणी असलेले गजेबो, बाक यामुळे बोरिवलीकरांना सातत्याने ही उद्याने खुणावत राहतात. विस्तीर्ण हिरवागार परिसर आणि निरनिराळ्या नागरी सुविधा असल्याने या दोन्ही उद्यानांमध्ये दररोज किमान १ हजारांहून अधिक आबालवृद्ध येतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या दोन्ही उद्यानांना मिळून दररोज सुमारे ६५ हजार लीटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता असते. मात्र, उद्यानांमध्ये शोष खड्डे तयार करुन, त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर हा उद्यानांतील सिंचनासाठी करण्यात येतो. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचतही याठिकाणी होते, हे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे ते सांगतात.
(हेही वाचा : मुंबईतील मराठी शाळांबाबत भाजपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे पत्रात?)
चार वर्षांत ओसाड जागा झाली सुशोभित…
या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान (Palm Garden) तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान (Scented Garden) ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरु करण्यात आली. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने तर फुलवलीच, पण त्यातून संपूर्ण परिसराचा कायापालट देखील घडून आला. या उद्यानांमध्ये कोणतेही मोठे स्थापत्य बांधकाम करण्यात आले नसल्याने, अत्यंत वाजवी खर्चात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे, हे विशेष!
प्रमोद महाजन उद्यान सुगंधित…
जवळपास ७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे ‘गोपीनाथजी मुंडे मनोरंजन मैदान’ तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे ‘प्रमोदजी महाजन मनोरंजन मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मैदानांवर फेरफटका मारणे म्हणजे निवांतपणाची सुखद अनुभूती ठरते आहे. नेत्रसुखद हिरवळ आणि आसमंतात दरवळणारा सुगंध यामुळे नागरिकांची पावले आपसूकच या उद्यानांकडे वळतात. परिसरातील इमारतींमधूनही या उद्यानांचे सुंदर विहंगम रुप दिसते. बोरिवलीतील आकर्षक स्थळ म्हणून ही उद्याने आज मिरवत आहेत.
एकाच जागी पामच्या १७ प्रजाती
ह्या उद्यानांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर मुंबई महानगरातील हे असे एकमेव ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी पाम वृक्षाच्या एकूण १७ प्रजाती आहे. या सर्व प्रजाती मिळून सुमारे ७०० ते ८०० पाम वृक्ष येथे दिमाखात उभे आहेत. यामध्ये फॅन पाम, बॉटल पाम, त्रिकोणी पाम, खजूर, नारळ, सुपारी, शॅम्पेन पाम, रेड लॅटिन पाम, फॉक्सटेल पाम, फिशटेल पाम, बिस्मार्किया पाम, सिल्हर पाम, स्वाम्प फॅन पाम, लिव्हेस्टोनिया, मॅजेस्टिक पाम अशा विविध प्रजातीच्या पामची लागवड करण्यात आलेली आहे.
गुलाब, मोगरा, चाफा पासून ते केवडा पर्यंतची झाडे एकाच ठिकाणी
सुगंधी उद्यानात निरनिराळ्या प्रकारची सुगंधी फुलझाडे एकाच ठिकाणी नांदत आहेत. या उद्यानाच्या एका बाजूने मोठा नाला वाहतो. ही बाब लक्षात घेऊन प्रामुख्याने देशी सुवासिक फुलझाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. गुलाब, मोगरा, चाफा, कुंद, अनंत, प्राजक्त, कणेर, कामिनी, सायली, लिली, मधूमालती, केवडा अशा सुवासिक फुलझाडांबरोबरच गवती चहा, बासमती, अडुळसा, तुळशी अशा औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड या उद्यानात केलेली आहे.
(हेही वाचा : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा… ‘या’ दिवशी पाणी येणार नाही)
फुल पाखरांचा वाढला संचार
दाट हिरवळ, उंच वाढलेले पाम वृक्ष तसेच विविध सुवासिक फुलझाडे यांचा परिणाम म्हणून या उद्यानांमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत असतात. विविध पक्ष्यांचा परिसरातील आवास वाढला आहे. अशा या उद्यानांना भेट देणे म्हणजे पुष्पप्रेमी, पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरते आहे.
Join Our WhatsApp Community