बक्षीस दिले नाही म्हणून ३ महिन्यांच्या चिमुरडीसोबत झाले असे काही… काळीज हेलावणारी घटना

याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, दोघांना अटक केली आहे.

मुलगी झाल्याचे बक्षीस दिले नाही म्हणून दोन तृतीय पंथीयांनी ३ महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून उचलून, समुद्रकिनारी वाळूत मुलीला जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना, कुलाब्यातील कफ परेड येथे उघडकीस आली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून कफ परेड पोलिसांनी दोन्ही तृतीय पंथीयांना अटक केली आहे.

काय झाला प्रकार

आर्या सचिन चिटकोट असे या चिमुरडीचे नाव आहे. आर्या तीन महिन्यांपूर्वी चिटकोट कुटुंबात जन्माला आली. ६ वर्षांच्या मुलानंतर दुसरे अपत्य आणि तेही मुलगी झाल्यामुळे चिटकोट कुटुंब आनंदात होते. मात्र, त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. चिटकोट कुटुंबात मुलगी जन्माला आली असल्याची माहिती तीन महिन्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या तन्नू (३०) या तृतीय पंथीयाला कळली. त्यामुळे गुरुवारी रात्री तो चिटकोट कुटुंबाच्या घरी बक्षीस मागण्यासाठी गेला होता. त्याने अकराशे रुपये, साडी आणि नारळ मागितला. मात्र चिटकोट कुटुंबियांनी त्याच्या हातावर ५० रुपये टेकवून त्याला हाकलून लावले. अपमानित होऊन तन्नू तेथून जाण्यास निघाला वाटेतच त्याला सोनू हा तृतीयपंथी भेटला, तन्नूने त्याला झालेला प्रकार सांगितला.

(हेही वाचाः पुरुषांनो सावध रहा! सोशल मीडियावरील ‘चॅट’, लावेल तुमची ‘वाट’)

अपहरण केले आणि…

आपल्या लोकांचा अपमान झालेला सहन करता येणार नाही, त्यांना अद्दल घडवली पाहिजे, असे म्हणून सोनू आणि तन्नू या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चिटकोट यांच्या घराजवळ आले. चिटकोट कुटुंब दार उघडे करुन झोपी गेले होते. त्याचा फायदा घेत दोघांनी आईच्या कुशीत झोपलेल्या ३ महिन्यांच्या आर्याला उचलून थेट समुद्राजवळ आणले. त्या ठिकाणी वाळूत खड्डा करुन आर्याला त्यात जिवंत पुरुन निघून गेले.

गुन्ह्याची दिली कबुली

शुक्रवारी सकाळी चिटकोट कुटुंबाला आर्या दिसून न आल्यामुळे घाबरलेल्या कटुंबियांनी कफ परेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आर्याचा शोध सुरू केला. दरम्यान आदल्या दिवशी रात्री घडलेला प्रकार चिटकोट कुटुंबियांनी पोलिसांना सांगून तन्नू या तृतीय पंथीयावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी वेळ न दडवता तन्नू आणि सोनू या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्या चौकशीत त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आर्याचा मृतदेह कुठे पुरला ते ठिकाण त्यांनी पोलिसांना दाखवले. पोलिसांनी आर्याचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून पूर्वतपासणीसाठी जे.जे. रुग्णालय येथे पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, दोघांना अटक केली आहे.

(हेही वाचाः महिला डॉक्टरच्या खोलीत होता हिडन कॅमेरा, मग झाले असे…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here