कत्तलीसाठी चक्क ट्रॅव्हल बसमधून गोवंशाची वाहतूक करण्यात आल्याची घटना वर्ध्यातील तळेगाव येथील सारवाडी नजिक घडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या बॉम्बशोधक पथकाने पाहणी करत वंशाची सुटका केली आहे. त्यामुळे तब्बल 12 गायींची कत्तल होण्यापासून वाचवण्यात आले आहे.
12 जिवंत गोवंशांची वाहतूक
शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौ-यासाठी वर्ध्यातील बॉम्बशोधक पथक तैनात होते. कारंजाकडून तळेगावकडे येत असताना सारवाडी नजिकच्या पारडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एम.एच.06 एफ.के.0921 ही मिनी ट्रॅव्हल बस उभी होती. या बसमध्ये गायी असल्याचा संशय पथकातील कर्मचा-यांना आला. पथकाने बसची तपासणी केली असता बसमध्ये 12 जिवंत गोवंश आणि दोन मृत गाई कोंबून भरलेले असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती पथकाने तळेगाव पोलिस ठाण्याला दिली.
(हेही वाचाः केवळ डोक्यावर हात ठेवणार आणि आजार बरे करणार, औरंगाबादमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश)
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत गोवंशांना टाकरखेड येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. गोवंशांची वाहतूक करणारे आरोपी मात्र पसार झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस मूळ आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community