मुंबईत आता सुगंध देणारी ‘कचरापेटी’!

कधीकाळी दुर्गंधीमुळे नकोशी वाटणारी ही कचरापेटी आता सुगंधामुळे सहकार नगरवासियांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

161

कचरापेटी म्हटली की आपण नाकाला हात लावल्याशिवाय तिथून फिरकणारच नाही. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नाकावर हात जातोच, नाहीतर खिशातला रुमाल तरी बाहेर येतो. सध्या कोविडमुळे नाकावर मास्क असला, तरी नाकं मुरडल्याशिवाय कचरापेटी असो वा कचऱ्याची गाडी असो, कुणीही पुढे जाणार नाही. वडाळ्यातील सहकार नगरमधील रहिवाशीही अशाचप्रकारे येथील कचरा पेटीमुळे आणि त्यातील दुर्गंधीमुळे त्रस्त होते. पण आता हीच कचरापेटी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. हीच कचरापेटी सहकार नगरची ओळख ठरू लागली. मुंबईतील पहिली अशी सुशोभित कचरापेटी सहकार नगरमध्ये बनवण्यात आली असून, कधीकाळी दुर्गंधीमुळे नकोशी वाटणारी ही कचरापेटी आता सुगंधामुळे सहकार नगरवासियांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

मुंबईतील पहिलीच सुशोभित कचरापेटी

वडाळा सहकार नगरमध्ये यापूर्वी कचरा टाकण्याची असलेली कचरापेटी ही मागील काही महिन्यांपासून कचरा वर्गीकरण केंद्र म्हणून ओळखले जाते. पण या कचरा वर्गीकरणामुळेही दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होतच होता. आता कचरा वर्गीकरणाची जागा, एखाद्या कार्पोरेट कार्यालयाची जागाच असल्याप्रमाणे सुशोभित असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी आपल्या नगरसेवक निधीतून कचरापेटी सुशोभित करण्याची पहिली संकल्पना मांडली. मुंबईत अशाप्रकारे सुशोभित करण्यात आलेली ही पहिलीच कचरापेटी ठरली आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय बालमवार आणि एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे आणि त्यांच्या टिमच्या पुढाकाराने हे शक्य झाल्याचे अमेय घोले म्हणाले.

IMG 20210320 WA0011

(हेही वाचाः आता झाडे लावणार ती मुंबईतल्या मातीत रुजणारीच!)

कचरा पेटीला केले व्हर्टिकल गार्डन

वडाळा येथील सहकार नगर ही ४६ इमारतींची मोठी वस्ती आहे. यामध्ये ८२६ कुटुंबे राहत असून, या सर्व घरांमधून दिवसाला १ टन कचऱ्याची निर्मिती होते. या सोसायटीत मागील अनेक वर्षांपासून ही कचरापेटी होती. पण जेव्हा प्रशासनाने कचरा वर्गीकरण करण्याचे निर्देश जारी केले, तेव्हा या कचरा पेटीच्या जागी कचरा वर्गीकरण केंद्रं सुरु झाले. पण कचरा म्हटले की दुर्गंधी येतेच. त्यामुळे ही कचरापेटी वेगळ्या प्रकारे सुशोभित करावी जेणेकरुन, नागरिकांना या कचरा पेटीमुळे त्रास होणार नाही. त्या दृष्टीकोनातून नगरसेवक निधीतून याचे सुशोभिकरण करण्यात आले. याप्रमाणे आजुबाजूच्या भिंती तोडून त्याच्या सर्व बाजुंनी व्हर्टीकल गार्डन विकसित करुन त्यावर सहकार नगरच्या नावाचा डिजिटल फलक लावण्यात आला. त्यामुळे कचरा पेटीचे सुशोभिकरणही झाले आणि सहकार नगरच्या नावाचा आकर्षक फलकही लावता आला. व्हर्टिकल गार्डनमध्ये काही अशा फुलझाडांची रोपटी लावली आहेत, ज्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी नाही तर, सुगंध दरवळेल. शिवाय याठिकाणी रातराणीचीही रोपटी लावण्यात येतील, जेणेकरुन रात्रीच्या वेळीही रातराणीचा सुगंध दरवळेल आणि कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होणार नाही.

IMG 20210320 WA0013

(हेही वाचाः वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका समित्यांचे कामकाज पुन्हा ‘व्हीसी’वर?)

अशाप्रकारे सुशोभिकरणाचा केलेला प्रयत्न हा नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: भेट देऊनही याची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गतही पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे यांनी याची दखल घेतली असल्याचे, घोले यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.