मागील काही वर्षांपासून मेट्रो रेल्वेच्या सुरु असलेल्या कामांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर यंदा खड्डयाविना प्रवास करताना मुंबईकरांना काहीसे गोंधळल्यासारखे वाटत आहे. मागील काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या ताब्यात असलेल्या या महामार्गाची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नव्हती. त्यातच मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली होती. परंतु यंदा हा महामार्ग महापालिकेला हस्तांतरीत झाल्यानंतर या याची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात उद्दभवणाऱ्या खड्डयांची काळजी महापलिकेच्या माध्यमातून केली जात असल्याने यंदा या महामार्गावरील प्रवास खड्डाविना करण्याचा अनुभव मुंबईकरांना होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ३ ऑक्टोबर २०२२ रोजी हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल आणि तातडीची कामे करण्यासाठी आणि या कालावधीमध्ये पावसाळ्यात दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी करता कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा Sharad Pawar On Partition : शरद पवारांना फाळणीच्या इतिहासाचे वावडे)
या निविदेत के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड – कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या कामंसाठी विविध करांसह १३१ कोटींमध्ये केले जाणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गांवर सततच्या पावसातही वाहतूक सुरळीत सुरू आहे, तसेच कुठेही खड्डा आढळला तरीही तातडीने भरला जात आहे. यामध्ये आरे उड्डाणपूल, सांताक्रुझ येस बँक समोरील भाग, जोगेश्वरी सेवा रस्ता, कुरार सब वे, जोगेश्वरी एसआरपीएफ कॅम्प परिसर, नेस्को, डॉ बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयसमोरील परिसर, विलेपार्ले मिलन सब वेजवळील सेवा रस्त्याचा भाग, मेट्रोपॉलिस जंक्शन, दहिसर टोल प्लाझा, वाकोला उड्डाणपूल परिसर आदी भागांमधील खराब भाग तसेच खड्डयांचा परिसराची डागडुजी करण्यात आली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडणाऱ्या खड्डयांमुळे महापालिकेला टिकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा महामार्ग महापालिकेने ताब्यात घेऊन या रस्त्याची देखभाल करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. यापूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नव्हती. पण त्यानंतर मेट्रोच्या कामांमुळे मेट्रोच्यावतीनेही यावर पडणाऱ्या खड्यांबाबतची काळजी घेतली जात नसल्याने मागील काही वर्षांपासून या मार्गावरील प्रवास खड्डयांचा बनला होता. या खड्डयांमुळे या मार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने होत होती. परंतु महापालिकेच्यावतीने यंदा खड्डयांची काळजी योग्यप्रकारे घेतली जात असल्याने मुंबईकरांना प्रथमच या मार्गावरून जाताना खड्डेविना प्रवास करण्याचा अनुभव मिळत असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community