Tree Cutting : झाडांचे मारेकरी कोण?

311
Tree Cutting : झाडांचे मारेकरी कोण?
  • सचिन धानजी

मुंबई महापालिका प्रशासन सध्या वातावरणीय बदलावर, तसेच प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यासाठी सर्व खटाटोप सुरु असतानाच सिमेंटची जंगले तयार करण्यावर भर दिला जात आहे. एका बाजूला ही सिमेंटची जंगले तयार होत आहेत आणि दुसरीकडे ही जंगले तयार करताना रस्त्याच्या कडेला असलेली झाडांची पाळेमुळे तोडून, कापून ती अप्रत्यक्षपणे मारण्याचाही कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली आम्ही अमूक लाख झाडांचे रोपण करणार आहोत; म्हणून बाता ठोकायच्या आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्ते कामांमध्ये विशाल, अतीविशाल वृक्षांची कत्तल करायची, असे सुरु आहे. (Tree Cutting)

आज नाही म्हटले, तरी मुंबईमध्ये जे पायाभूत सुविधा प्रकल्प, तसेच सुविधा कामे हाती घेतली जातात, त्यामध्ये आड येणारी झाडे कापली जातात किंवा पुनर्रोपित केली जातात. मग ती मेट्रोची कामे असतील किंवा बुलेट ट्रेन किंवा मलनि:सारण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, नाले रुंदीकरण, तसेच रस्त्यांची कामे आदींसह इमारतींच्या पुनर्विकासात येणारी झाडे कापली जातच आहे. आता ज्या प्रकारे मुंबईत सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत, त्यामध्ये रस्त्यासह बाजूच्या पर्जन्य जलवाहिनींचीही कामे समाविष्ट आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची मुळे जर रस्त्याच्या खालून पसरली जात असतील, तर ती जेसीबीद्वारे खोदकाम करताना तोडली जात आहे. मुंबईत हाती घेतलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांमध्ये आपल्याला हे दिसून येईल. मुळात जिथे झाडांची मुळे पसरली आहेत, तेवढ्या भागात जेसीबीचा वापर टाळून कुदळ आणि फावड्याद्वारे जरी खोदकाम केले, तरी झाडांची मुळे तुटण्यापासून वाचवता येऊ शकते आणि पर्यायाने झाडांचे संवर्धन करू शकतो. आज आपण झाडे किती लावतो, यापेक्षा अस्तित्वात असलेल्या झाडांचे संवर्धन किती करतो, हे महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा एका झाडाचे रोपटे लावतो, ते रोपटं झाडात, तसेच वृक्षामध्ये रूपांतरित व्हायला अनेक वर्षे जातात. (Tree Cutting)

(हेही वाचा – Pakistan मधील महाविद्यालयात भारतीय गाण्यावर नाचण्यास बंदी; नेमकं कारण काय?)

आपल्या एक-दोन पिढ्या निघून जातात. ती जुनी झाडे जर आपण टिकवली नाहीत, तर आपण वातावरणीय बदलाचा सामना कसा करणार आहोत? आपण आज झाडे लावली आहेत; पण जी सावली जुने वृक्ष देऊ शकतात, ती सावली आज-काल लावलेली झाडे देऊ शकतात का? त्यामुळे रस्ते विकासांची कामे हाती घेताना रस्त्यालगत असलेल्या झाडांची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने रस्ते विभागाला उद्यान विभागाशी समन्वय साधून काम करण्याचे आदेश द्यायला हवे होते. ज्याप्रमाणे रस्ते अभियंता नेमला आहे, तसेच विभागातील उद्यान सहाय्यकावरही जबाबदारी टाकून विभागातील रस्ते काँक्रिटच्या कामांमध्ये कुठे झाडाला धोका पोहोचत नाही, हे पहायला हवे. खोदकाम करताना त्यांच्या देखरेखीखाली व्हायला हवे होते. हरित लवादाच्या निर्णयानुसार रस्ते बांधकामांमध्ये झाडांभोवती एक बाय एक मीटरची जमीन मोकळी सोडली किंवा नाही आणि त्यात लाल माती टाकली का, याची सर्व देखरेख उद्यान विभागावर सोपवणे आवश्यक होते. एक गोष्ट या माध्यमातून समोर येते की, जरी झाडांच्या बुंध्याभोवती जागा सोडून माती टाकली गेली, तरी त्या झाडाची मुळे कापली गेली असतील आणि त्या मुळांवर सिमेंटचा थर चढला असेल, तर त्या झाडांच्या मुळांना पाणी कसे मिळणार आणि झाडांची वाढ कशी होणार? (Tree Cutting)

मुंबईत साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती, तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करुन छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडू नयेत तसेच झाडे पडून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होवू नये यासाठी महापालिका प्रशासन काळजी घेत असते. नाही म्हटले तरी मुंबईत सुमारे सरासरी एक लाख झाडांची छाटणी केली जाते. म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणीवर अधिक भर दिला जातो. एकाबाजुला पावसाळ्यात झाड पडू नये म्हणून पावसाळ्यापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. दुसरीकडे रस्त्यांच्या कामांमध्ये मुळे कापली जात असतानाही त्याकडे लक्ष नसावे ही बाब गंभीर आहे. माटुंगा येथील मनमाला टँक रोडवरील सिमेंट काँक्रिटच्या कामामध्ये तेथील झाडाची मुळे अशा प्रकारे खोदकामात कापली गेली की, ते झाड अखेर पडले आणि आसपासच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीसह लोकांच्या खिडक्यांचेही नुकसान केले. त्यानंतर उद्यान विभागाने रस्ते कामांमधील झाडांच्या मुळावर उठलेल्या कंत्राटदारांच्या कामांवर लक्ष वेधून रस्ते विभागाला सूचित केले. (Tree Cutting)

(हेही वाचा – Beed Crime : गावोगावी वाल्या, खोक्या; गुन्हेगारीच्या छायेत गाव-शहरांचा कारभार)

मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर, (६९८ रस्ते ) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्यातील आतापर्यंत सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. काही कामांमध्ये खोदकामही पूर्ण झाले आहे, जे झाडांच्या मुळावर उठलेले आहे. ७५ टक्के रस्त्यांच्या खोदकामांमध्ये झाडांची मुळे कापली गेली, असे जरी आपण गृहीत धरले, तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या १ लाख ८५ हजार झाडांच्या तुलनेत किमान २५ टक्के झाडे जरी आपण गृहीत धरली तरी, तर ४० ते ४ ५ हजार झाडांची मुळे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये कापली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Tree Cutting)

मुंबईत कुठे आहे कारवाई ?

आज केवळ २० हजारांचा दंड भरून कंत्राटदार मोकळे होतील; पण विभागातील सावली निर्माण करणारी ही झाडे भविष्यात येणाऱ्या वादळी वाऱ्यांच्या पावसात तग धरून रहाणार नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात सर्वाधिक झाडे उन्मळून पडण्याच्या दुर्घटना घडतील आणि या दुर्घटनेत कुठलीही मनुष्यहानी होऊ नये, हीच प्रार्थना आपण करू शकतो. पण या सर्वांत एवढ्या वर्षांचे वृक्ष पडून गेले त्यांचे काय ? त्या वृक्षाच्या जागेवर एक रोपटे लावले जाईल, पण आज आम्हाला जो वातावरणीय बदलाचा फटका बसतो, तो ही झाडे नष्ट झाल्याने अधिक बसणार आहे, याची कधी तरी महापालिका प्रशासन म्हणून काळजी घेतली जाणार आहे की नाही?वाढत्या शहरीकरणामुळे मुंबई महानगरातून लुप्त होणाऱ्या अनेक देशी प्रजातीच्या झाडांची छाया मुंबईकरांना पुन्हा मिळावी, यासाठी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाद्वारे लवकरच या झाडांचे रोपण करण्यात आले. तिथे कोण सावलीला जाणार आहे ? एक हरित पट्टा निर्माण करणे वगरै ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण गंभीरतापूर्वक विचार करू आणि त्याप्रमाणे आचरणात आणू, तेव्हाच आपले जीवन सुसह्य होईल, हे निश्चित ! (Tree Cutting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.