-
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मलबार हिल (Malabar Hill) परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकर नागरिकांच्या प्रचंड पसंतीला उतरला आहे. रविवारी ३० मार्च २०२५ रोजी लोकार्पण झाल्यानंतर याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांची संख्या मोठी आहे. रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांत महापालिकेची ८६ हजार रुपयांची कमाई झाली आहे.
निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी काल पहिल्या दिवशी रविवारी ३० मार्च २०२५ रोजी १ हजार ५३ नागरिक व पर्यटकांनी भेट दिली. या तिकिट नोंदणीतून २६ हजार ९२५ रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी दुप्पट म्हणजे २ हजार ३४६ नागरिक व पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. या नोंदणीतून ६० हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच आठवड्याच्या अखेरसाठीही मोठ्या प्रमाणात तिकिट नोंदणी होत आहे.
(हेही वाचा – SCERT च्या खासगी शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रच)
निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी; सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश गगराणी यांनी दिले आहेत.
झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. निसर्ग उन्नत मार्ग येथे पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आणि ऑनलाईन मर्यादित स्लॉट लक्षात घेता नागरिक व पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Google Gemini 2.5 Pro : चॅट जीपीटीच्या व्हायरल गिबली स्टुडिओला शह देण्यासाठी गुगलचं जेमिनी २.५ प्रो ग्राहकांसाठी बाजारात)
अशी करा तिकिट नोंदणी
मलबार हिल (Malabar Hill) येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन Book Now वर क्लिक करा.
- तारीख आणि हवा असलेला कालावधी (Slots) निवडा.
- Next वर क्लिक करून माहिती भरा.
- पुन्हा Next वर क्लिक करून उजव्या बाजूला संख्या निश्चित करा.
- Next वर क्लिक करून शुल्क भरा.
- ऑनलाईन सशुल्क तिकिट प्रणालीचा वापर करून पहाटे ५ ते रात्री ९ दरम्यान निसर्ग उन्नत मार्गाला भेट देता येईल.
- भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क.
- एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एका स्लॉट मध्ये २०० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
- हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचा कालावधी (Slots) आहे. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्यानेच प्रवेश मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community