इंग्रजी ही फक्त संवादाची भाषा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे तब्बल दहा भाषांमधून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण दिले तर ते शिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि यातून ते व्यावसायिक बनतील. यापुढे राज्यभरातील शाळांमधून हायटेक शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेमध्ये वेब कॅमेरा असेल. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण त्यांना समजते का, हे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारे जाणून घेतले जाईल, राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुर्ला येथील महापालिका पब्लिक स्कूलच्या लोकार्पणप्रसंगी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला (पूर्व) नेहरूनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल या शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण शनिवारी २२ जुलै २०२३ दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार तुकाराम काते, सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आणि इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती. इर्शाळवाडी (जिल्हा रायगड) येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम शिक्षणमंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आला. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाचे टप्पे असतात. तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने महानगरपालिका शिक्षणाच्या बाबतीत उत्तम कार्य करत असल्याचे गौरवोद्गारही मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
मुंबईतील शाळांमध्ये ‘रीड मुंबई’ उपक्रम
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईतील शाळांमध्ये ‘रीड मुंबई’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यभरातील शाळांसाठी देखील ‘रीड महाराष्ट्र’ नावाने हा उपक्रम राबविला जाईल. शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे, यासाठी शाळांच्या गच्चीवर ‘किचन गार्डन’ तयार करण्यात यावीत. मध्यान्ह भोजनासाठी लागणारा भाजीपाला येथेच तयार करावे, अशी सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी केली.
बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करावेत – आमदार मंगेश कुडाळकर
महानगरपालिकेच्या कुर्ला (पूर्व) नेहरूनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल या शाळेतून अनेक मोठे अधिकारी घडले आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देखील याच शाळेत आम्ही घेतलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून झाली आहे. सध्या येथे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. परंतु, या भागातील आर्थिक गरजू नागरिकांच्या पाल्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी या शाळेत बारावीपर्यंतचे वर्गदेखील सुरू करावेत, अशी मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपल्या भाषणातून केली.
(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान राज्याच्या प्रकल्पांवर चर्चा)
पायाभूत आणि शैक्षणिक संसाधनांसह सुसज्ज इमारत, ७ डिजिटल वर्ग
कुर्ला (पूर्व) नेहरू नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल संकुल या शाळेची स्थापना १९६२ मध्ये झाली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेच्या इमारतीचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. लोकार्पण झालेल्या नवीन इमारतीमध्ये एकूण सात शाळा असून एकूण ७० वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी ७ वर्ग हे डिजिटल स्वरूपाचे आहेत. ४ प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळा असलेल्या या संकुलात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १२२ आहे. शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि तेलगू या माध्यमातून शिक्षण दिले जाते. क्रीडांगण, स्मार्ट टीव्ही, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक यासह विविध सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आयत्या बिळावर नागोबा
दरम्यान स्थानिक माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी, ही शाळेची दोन मजली इमारत मागील सात वर्षांपासून बंद होती आणि आपल्या प्रयत्नाने ही शालेय इमारत बांधण्याचा प्रयत्न केला गेला. प्रशासन याठिकाणी पुन्हा दोन मजल्याचीच इमारत बांधणार होते, परंतु आपण पक्षप्रमुख व युवा सेना अध्यक्षांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी याठिकाणी सात मजले बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या शाळेच्या पायाभरणीचा कार्यक्रम तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते झाला होता. त्यामुळे आपल्या प्रयत्नाने ही शाळा उभारल्यानंतर आयत्या बिळावर नागोबा याचे श्रेय घ्यायला तयार झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना दिली. या शाळेतील मुले शिवसृष्टी व कामगार नगर येथील महापालिका शाळेत जात होती, तेव्हा हे आमदार कुठे होते असा सवाल त्यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community