रायगड जिल्ह्यातील रोहा येथे नागोठाण्यातील पिंपळवाडी गावातील आदिवासी ठाकूर जमातीतून पहिल्यांदाच अवयवदान झाल्याची घटना घटली. गणपत पिंगळे (५८) या पोलिस अधिका-याने मरणानंतर अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. अचानक पक्षाघाताचा त्रास होत पतीला गमावल्यानंतर गणपत पिंगळे यांच्या पत्नीने आणि मुलामुलींनी त्यांच्या मरणानंतर अवयवदानाची इच्छा पूर्ण केली.
नेमकी घटना काय
सोमवारी २८ नोव्हेंबरला गणपत पिंगळे यांना सकाळी कंबर आणि डोकेदुखीचा त्रास सुरु होता. सतत उलट्या होत असताना अचानक ते बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या दवाखान्यात घेऊन गेले असता, पिंगळे यांना रुग्णालयात दाखल कऱण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कुटुंबीयांनी तातडीने गणपत पिंगळे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती त्यांना पक्षाघात झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. दोन दिवसांनी डॉक्टरांनी गणपत पिंगळे यांना मृत घोषित केले. अखेरिस पत्नीने आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यास पुढाकार घेतला.
६ जुलै १९६५ साली आदिवासी ठाकूर जमातीत जन्मलेल्या गणपत पिंगळे यांना सुरुवातीपासून समाजकार्याची आवड होती. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी माझे अवयवदान जरुर करावे जेणकरुन एखाद्या गरजू रुग्णाला नवे आयुष्य मिळेल असे सतत वडिल मला सांगायचे, असे विजया पिंगळे म्हणाल्या. गणपत पिंगळे यांच्या कार्यामुळे आदिवासी ठाकूर समाजात अवयवदानासाठी प्रेरणा मिळाल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community