हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा मुस्लिम समुदायाकडून केला जात आहे. परंतु, हा दावा पूर्णतः खोटा असून, हिंदूंच्या मालमत्तांवर अतिक्रमण करण्याचा (लँड जिहाद) छुपा अजेंडा यामागे असल्याचे परखड मत अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा महंत पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री महाराज यांनी व्यक्त केले. तसेच धार्मिक ऐक्याची भाषा करणाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरी करताना हातात धातूच्या वस्तू का बाळगल्या होत्या, असा सवालही त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना उपस्थित केला.
प्रश्न : ही शेकडो वर्षांची परंपरा असल्याचा मुस्लिम समुदायाचा दावा आहे. याकडे आपण कसे पाहता?
स्वामी अनिकेतशास्त्री महाराज : ज्यावेळेस ते मंदिरात प्रवेश करीत होते, त्यावेळी त्यांच्या हातामध्ये धातूच्या अनेक वस्तू होत्या. त्याबाबत एसआयटीच्या तपासात अधिक उलगडा होईल. पण कोणत्याच मीडियाने हा विषय उचलला नाही. त्यांना जर मंदिरात धूप दाखवायचा होता, तर धातूच्या वस्तू सोबत बाळगायचे प्रयोजन काय? गेल्या वर्षी तीन-चार लोकांनी असाच प्रयत्न केला होता. त्यावेळेस आम्ही तो हाणून पाडला. त्यामुळे यंदा ५० ते ६० लोकांचा जमाव घेऊन ते त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न करीत होते. अवघी दोन वर्षे त्यांनी हा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेकडो वर्षांची परंपरा असल्याचा दावा सुरू केला. त्यांना जर खरोखर प्रवेश दिला, तर काही दिवसांनी मंदिरावर दावा ठोकतील. त्यांच्या या कृत्याला काही आसुरी प्रवृत्तीचे राजकारणी समर्थन देत आहेत. त्यामुळे त्यांची हिंमत वाढत आहे.
(हेही वाचा Shri Trimbakeshwar Temple : “…अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मंदिरं दोन दिवस बंद ठेवू” – हिंदू महासंघाचा इशारा)
प्रश्न : हिंदु-मुस्लिम ऐक्य जपण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदूंना हे मान्य नाही का?
स्वामी अनिकेतशास्त्री महाराज : मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. मग मंदिरात येणे, महादेवाच्या पिंडीला चादर चढवणे, धुपारती करण्याचा अट्टाहास कशासाठी? दुसरी गोष्ट म्हणजे, हे लोक जेव्हा मंदिरात प्रवेश करू इच्छित होते, तेव्हा रात्रीचे साडेनऊ ते पावणे दहा वाजले होते. त्र्यंबकेश्वरमधील लहान मुलालाही विचारा, मंदिर ९ वाजता बंद होते. गेल्या १५० वर्षांत या वेळेत कधीही बदल झालेला नाही. राष्ट्रपती येवोत की पंतप्रधान; रात्री ९ वाजता हे मंदिर बंद होणारच, असा नियम आहे. असे असताना पावणे दहा वाजता मंदिरात प्रवेश करायचा उन्माद का केला? पोलिसांशी हुज्जत का घातली? जेव्हा डाव उलटला तेव्हा ते म्हणतात की, आम्ही हिंदु-मुस्लिम ऐक्य, सौदार्हासाठी गेलो होतो. त्यावर आमचा प्रतिप्रश्न आहे, तुम्ही जर सौदार्हासाठी मंदिरात येत आहात, तर आम्हालाही मशिदीत हनुमान चालिसा म्हणू द्या, तुम्हीही बांधिलकी जपा. ते सांगत होते की, आम्ही फक्त धुपारती करणार होतो. पण, त्या व्हिडिओमध्ये सुस्पष्ट दिसत आहे की, डोक्यावर टोपी, टोपीवर टोपली आणि टोपलीत चादरी होत्या. धुपारती करणारा माणूस इतके साहित्य घेऊन येतो का मंदिरात?
प्रश्न : या प्रथेबद्दल त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे काही लिखित पुरावा आहे का?
स्वामी अनिकेतशास्त्री महाराज : गेल्या १०० वर्षांपासून आमचे देशपांडे कुटुंब त्र्यंबकेश्वरला वास्तव्यास आहे. इतक्या वर्षांत आम्हाला कधीही असले प्रकार दिसले नाहीत. इतकेच नव्हे तर, त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे याबद्दल कोणताही लिखित पुरावा नाही की, अशी कोणती प्रथा परंपरा आहे. याउलट ब्रिटिशांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ बोर्ड लावला आहे, फक्त हिंदूंनाच प्रवेश. त्यामुळे असे कोणतेही बोगस दावे करून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नयेत. ते सय्यद नावाचे गृहस्थ घसा फोडून मीडियाला सांगत आहेत, मी हरहर महादेव, जय श्रीराम म्हणतो. आमचा पूर्ण उदरनिर्वाह हिंदूंमुळे आहे, त्र्यंबक राजामुळे आहे. आम्ही पूजेचे साहित्य विकतो, धोतर विकतो, नारायण नागबळीचे साहित्य विकतो. आमचे त्यांना इतकेच सांगणे आहे, तुम्हाला हिंदू धर्माविषयी इतकी आस्था, आपुलकी असेल, तर तुम्ही घरवापसी करा. हिंदू धर्मात या. आम्ही स्वतःहून तुमच्या हाताला धरून मंदिरात रुद्राभिषेक करू.
प्रश्न : हिंदूंच्या मालमत्ता बळकावण्याची काही उदाहरणे सांगता येतील का?
स्वामी अनिकेतशास्त्री महाराज : नाशिकमध्ये पोर्णिमा बसस्थानकानजीक इस्कॉन मंदिर आहे. तिथून ५०० मीटर पुढे गेलात की ९५ टक्के मुस्लिमांची घरे दिसून येतील. हिंदू तेथून हळूहळू कमी होऊ लागले आहेत. तिथे एक प्राचिन श्रीराम मंदिर आहे. अलिकडेच हे सर्व मुस्लीम लोक महापालिकेकडे गेले, त्यांनी अर्ज दिला की, या परिसरात ९५ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यामुळे या जागेवर रामाचे मंदिर कशाला हवे? त्या जागेवर आम्हाला मशिदीसाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे नाशिकचे ताजे उदाहरण आहे.
(हेही वाचा Trambakeshwar Temple : महादेवाला हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी)
Join Our WhatsApp Community