महाराष्ट्रासह देशाच्या केंद्रीय शिक्षण मंडळात इतिहासाच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास एक पानाचा आणि मुघलांचा इतिहास पानेच्या पाने भरून शिकवला जायचा. ही बाब लक्षात आल्यावर यात बदल करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीसारख्या अनेक संघटनांनी प्रयत्न केले. वारंवार येणाऱ्या प्रत्येक सरकारला हे सांगून आता कुठे इतिहासाच्या पुस्तकांत बदल झाला आहे. मात्र ही जागृती अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलांमध्येही झाली असल्याचा अनुभव आला आहे. त्यातूनच अमेरिकेतील एका शाळेत इतिहासाच्या पुस्तकातून औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करणारा धडा वगळून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम शिकवणारा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. ही किमया अमेरिकेत शिकणारी पुण्यातील त्रिशा हिने घडवून आणली आहे.
शिक्षिकेला सांगितला खरा इतिहास
पुण्यातील बाणेर येथील अतुल जयकुमार आवटे यांची पुतणी त्रिशा सागर आवटे ही अमेरिकेतल्या मॅडिसन स्टेटमधील वेस्ट हायस्कूलमध्ये इयत्ता 11वीमध्ये शिकत आहे. एकदा तिच्या इयत्तेतील इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबवर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवण्यात येत होता. त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता, याबद्दल लिहिलेले होते. शिक्षिका हा धडा शिकवत असताना त्यावेळी त्रिशाने धाडस करून शिक्षिकेला ‘तुम्ही शिकवत असलेला इतिहास खोटा आहे, असे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या वर्गाला सांगितला
त्यानंतर त्रिशाने औरंजेब सर्वश्रेष्ठ नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हेच सर्वश्रेष्ठ होते, असे सांगत शिवरायांबद्दल सगळा खरा इतिहास त्रिशाने वर्गात सांगितला. अलेक्झांडरच्या कथा ऐकून वाढलेल्या अमेरिकन मुलांना शिवरायांचा हा धाडसी इतिहास रोमांचित करून गेला. शिक्षिकेलाही हा इतिहास नवा होता; पण तो इंटरेस्टिंग वाटला.
शिक्षिकेने शिवरायांचा इतिहास अभ्यासला
त्रिशाने शिवरायांचा इतिहास सांगितल्यावर शिक्षिकेने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल खूप वाचन केले. सगळी माहिती मिळवली. याचा परिणाम असा झाला की, आता त्या शाळेमध्ये पुढील वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे, जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते, हे कळावे. सध्या त्रिशाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Join Our WhatsApp Community