Tuberculosis Detection Campaign : येत्या सोमवारपासून क्षयरोग आणि कृष्ठरोग्यांचा घराघरांमध्ये जावून घेणार शोध

227
Tuberculosis Detection Campaign : येत्या सोमवारपासून क्षयरोग आणि कृष्ठरोग्यांचा घराघरांमध्ये जावून घेणार शोध
Tuberculosis Detection Campaign : येत्या सोमवारपासून क्षयरोग आणि कृष्ठरोग्यांचा घराघरांमध्ये जावून घेणार शोध

केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार मुंबईत २०२५ पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे (Tuberculosis Detection Campaign) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुंबईत २० नोव्हेंबर २०२३ ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम (एसीएफ) आणि कुष्ठरोग शोध अभियान (एलसीडीसी) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या नवीन रुग्णांची शोध मोहीम राबविली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग ही मोहीम राबवणार आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान १० लाख ८८ हजार घरांमधील सुमारे ४९ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक यांचा एक चमू अशा ३ हजार ११७ चमूंद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजीकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील.

महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे मुंबईतील सर्व २४ विभागांमधील २८ CBNAAT वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ४२ CBNAAT यंत्रांद्वारे क्षयरुग्णांकरीता विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत. मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरीता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारा दरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

क्षयरोगाची लक्षणे :

१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे

कुष्ठरोगाची लक्षणे :

रुग्णांच्या त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार आहेत. बहुविध औषध उपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे एम. डी. टी. चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. बहुविध औषध उपचाराची पाकिटे महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने तसेच अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.

(हेही वाचा-World Cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी आकाशात ‘एअर शो’ दाखवला जाणार, सूर्यकिरण टीमवर जबाबदारी)

घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. तसेच क्षयरोग व कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता रुग्णांनी महानगरपालिका तथा शासकीय रुग्णालयात लवकरात लवकर संपर्क साधावा व उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी या मोहिमेत प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग संशयितांची तपासणी जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी मोफत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.