TB Free Mumbai : मुंबईतील टीबी दवाखान्यांमधील औषधेच गायब

211
TB Free Mumbai : मुंबईतील टीबी दवाखान्यांमधील औषधेच गायब
TB Free Mumbai : मुंबईतील टीबी दवाखान्यांमधील औषधेच गायब

येत्या २०२५ पर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय बाळगून महापालिकेनेही टीबीमुक्त मुंबई करण्याच्या दृष्टीकोनातून क्षय रुग्णांचा शोध घेऊन उपचार राबवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये क्षयरोगाची औषधेच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. मानखुर्द, गोवंडी, धारावी आदी भागांसह मुंबईतील अनेक भागांमधील दवाखान्यांमधील ही औषधेच उपलब्ध नसल्याने मुंबई टीबीमुक्त कसे होणार असा सवाल उपस्थित होत आहे. (TB Free Mumbai)

सन २०२५ पर्यंत भारत देश क्षयमुक्त करण्याचे ध्येय भारत सरकारने घोषित केले आहे. भारतातील एकूण क्षयरोग रुग्ण संख्येपैकी मुंबईमधे सुमारे ३ टक्के ‘औषध संवेदनशील’ क्षयरुग्ण व १४ टक्के ‘औषध प्रतिरोधी अर्थात ड्रग रेजिस्टेंट क्षयरुग्ण’ असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एकूण औषध प्रतिरोधी क्षयरुग्ण संख्येपैकी सुमारे ५८ टक्के ‘औषध प्रतिरोधी क्षयरुग्ण’ हे मुंबईत आढळतात. मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी ४ ते ५ हजार औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांचे निदान करण्यात येत असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. (TB Free Mumbai)

मात्र, क्षय रोगाचे अधिक रुग्ण आढळून येत असलेल्या एम पूर्व विभागातील गोवंडी, देवनार, बैंगनवाउ, मानखुर्द, शिवाजीनगर, चिता कँप, जी उत्तर विभागातील धारावी आदी भागातील दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याने या औषधांअभावी रूग्णांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. एका बाजूला घरोघरी जाऊन टीबी रुग्णांचा शोध घेतला जात असताना दुसऱ्या बाजूला या रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधेच या दवाखान्यांमध्ये उपलब्ध नाहीत. औषधांअभावी रुग्णांच्या होणाऱ्या या गैरसोयीबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हा आजार नियंत्रणात येण्याऐवजी अधिक वाढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (TB Free Mumbai)

मुंबईतील मानखुर्द, गोवंडीसह अनेक दवाखान्यांमध्ये क्षयरोगांची औषधे उपलब्ध नसल्याने समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बुधवारी मानखुर्द येथील भेटीत निवेदन देत या प्रकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आणि ही औषधे त्वरित उपलब्ध करून उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. (TB Free Mumbai)

(हेही वाचा – Abu Azami : आयकर विभागाने वाढवल्या अबू आझमींच्या अडचणी)

या क्षय रुग्णांनी प्रवास केल्यास इतर नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, संबंधीत क्षय रुग्णांचा प्रवास कमी करणे व त्यांना त्यांच्या घराशेजारीच उपचार उपलब्ध करुन देण्याची सुविधा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दिली जात आहे. मात्र, एका बाजुला क्षयमुक्त मुंबई करण्याचा संकल्प महापालिका आरोग्य विभाग करत असला तरी प्रत्यक्षात क्षय रोग रुग्णांना आपल्याच दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध होत नाही ही गंभीर बाब असल्याचे रुकसाना सिद्दीकी यांनी म्हटले आहे. (TB Free Mumbai)

सायक्लोसेरीन २५० एमजी कॅप्सुल, लाईनझोलिड ६०० एमजी, क्लोफाझामिन ही औषधे माझ्या विभागातील दवाखान्यांसह मुंबईतील बहुतांशी दवाखान्यांमध्ये उपलब्ध नसल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य मंत्र्यांसह महापालिका अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनाही आपण हे निवेदन दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सध्या काही प्रमाणात टीबी रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा दवाखान्यांमध्ये तुटवडा असल्याचे कबूल केले. या टीबी रुग्णांची संख्या वाढल्याने हा तुटवडा जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यासाठी आवश्यक असणारी औषध खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (TB Free Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.