मुंबईत तलाव भरण्याचा श्रीगणेशा झाला… ‘हे’ तलाव भरले

मागील वर्षींच्या तुलनेत दहा दिवस आधी हे तलाव भरुन वाहू लागले आहे.

76

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांपैकी सर्वात लहान तलाव असलेल्या तुळशी तलावातील पाण्याने वरची पातळी गाठली आहे. सर्व तलाव आणि धरणांमध्ये सर्वात प्रथम भरणारे तुळशी तलाव शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागले आहे. यंदा तुळशी तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याचे पहायला मिळाले असले, तरी मागील वर्षींच्या तुलनेत दहा दिवस आधी हे तलाव भरुन वाहू लागले आहे. मागील वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे तलाव भरुन वाहू लागले होते.

१.८ कोटी लिटर पाण्याचा होतो पुरवठा

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हे सर्वात लहान तलाव असून, यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर (१.८ कोटी लिटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे तलाव भरुन वाहू लागले आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

IMG 20210716 WA0068

(हेही वाचाः मुंबईकरांसमोर जलसंकट… पाणीकपातीची दाट शक्यता)

यााधीच्या वर्षी कधी भरले तलाव?

तुळशी तलाव क्षेत्रात १ जूनपासून १९५० हून अधिक मिमी. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. ८०४६ दशलक्ष लिटर उपयुक्‍त जलसाठ्याची क्षमता असणारा हे तलाव, २०१९ मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले होते. तर २०१८ मध्‍ये ९ जुलै रोजी, २०१७ मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागले होते.

…तर विहार तलावही भरणार

मुंबईला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून १८७९ मध्ये कृत्रिम तलाव उभारुन या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून, तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेले असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लिटर(८०४६ दशलक्ष लिटर) एवढा असतो. हे तलाव पूर्ण भरुन वाहू लागल्यानंतर, या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. त्यामुळे विहार तलावही अशाचप्रकारे मुसळधार पाऊस कोसळू लागल्यास लवकरच भरेल, असे बोलले जात आहे.

(हेही वाचाः मुंबईत कोसळधार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.