रत्नागिरी शहरानजीक भाट्ये समुद्रात खाडीजवळ रविवारी, १६ एप्रिलला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. ही दोन्ही मुले शहराच्या कोकणनगर भागातील आहेत.
कोकणनगर येथे राहणारा प्रणय जाधव (वय २४) आपल्या शेजारी राहणारा अबूबकर शेख (वय ८) रेहान शेख (वय ११) यांना घेऊन रविवारी सकाळी १० वाजल्यापासून फिरायला बाहेर पडला होता. शहरातील वरच्या भागात फिरून हे तिघे जण भाट्ये पुलावर आले. भाट्ये पुलाच्या बाजूला पूल संपल्यावर एक पायवाट आहे. त्या पायवाटेने तिघेजण पुलाखालच्या भागात आले. पाण्यात आंघोळ करण्यासाठी प्रणय जाधव आणि रेहान शेख उतरले. पण अबूबकर शेख पोहायला येत नसल्याने काठावरच राहिला. पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ते बुडत असलेले पाहून अबूबकरने आरडाओरडा केल्यावर पुलावर जाळी विणत असलेले लोक धावत खाली आले. त्यांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नाकातोंडात पाणी गेल्याने या दोघांचा मृत्यू झाला. भाट्ये पुलाच्या खाडीच्या तोंडाशी गाळ साचलेला असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा मुलांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बुडालेल्या दोघांना बाहेर काढल्यानंतर उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वी ते मरण पावले होते.
(हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम; नागरिक हैराण!)
Join Our WhatsApp Community