कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांचे अंत्यसंस्कार फ्रंट लाईन वर्कर करायचे, नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नव्हते, यामुळे त्यावेळी अंत्यसंस्कारात बऱ्याच अडचणी आल्या, मात्र सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात येत होते, बंगळुरूमध्ये मात्र भलताच प्रकार उघडकीस आला आहे, येथील रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत झालेल्या दोन कोरोनबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेच नाही. तब्बल १६ महिन्यांनी ते मृतदेह सापडले आणि सगळ्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे शवागृहात नेमके काय घडले होते, याचा तपास पोलिस करत आहेत.
मृतदेह कुजले
67 वर्षीय मुनिराजू यांचे 2 जुलै 2020 रोजी बेंगळुरू येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असावे, असे गृहीत धरून मुनिराजू यांनी सर्व धार्मिक विधी केले. असाच प्रकार 40 वर्षांच्या दुर्गा नावाच्या महिलेच्या मृतदेहाबाबत झाला. 2 जुलै 2020 रोजी दुर्गा यांचाही मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु या दोन्ही मृत्यूचे सत्य आता समोर आले आहे. कारण वस्तुतः या दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेच नाही. दोघांचेही मृतदेह ईएसआय हॉस्पिटलच्या शवागाराच्या रेफ्रिजरेटरमध्ये पडून कुजून गेले. या मृतदेहांची कोणीही काळजी घेतली नाही.
(हेही वाचा चिंता वाढली! आफ्रिकेतून मुंबईत ४६६ प्रवासी आले)
नेमके काय घडले?
हे दोन्ही मृतदेह रुग्णालयाच्या जुन्या शवागाराच्या फ्रीझरमध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णालयाचे नवीन शवागार सुरू करण्यात आले व त्यानंतर सर्व मृतदेह नवीन शवागारात ठेवण्यात आले. हे दोन्ही मृतदेह जुन्या शवागारातच राहून गेले. तब्बल 16 महिन्यांनंतर शनिवारी हे दोन्ही मृतदेह सापडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण निष्काळजीपणाचे आहे की यामागे आणखी काही कारण असावे याचा शोध सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community