गडचिरोलीतील सिटी१ वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्यानंतर चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत तीन माणसांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी मूल तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन गुराख्यांना एकाच वाघाने मारले. याआधी सोमवारी नागभिड येथे एका गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. मूल तालुक्यातील हल्ल्यात नेमक्या कोणत्या वाघाने हल्ला केला ही माहिती बुधवारी रात्रीपर्यंत वनविभागाकडे नव्हती. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हल्लेखोर वाघाला जेरबंद केले जाईल, असे आश्वासन चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी दिली.
( हेही वाचा : दिवाळीत अनलिमिटेड मनोरंजन; फक्त ५९ रुपयांमध्ये मिळवा १५हून अधिक OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन)
मूल जिल्ह्यातील चिंचोला तालुक्यात राहणा-या दोन गुराख्यांवर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास वाघाने हल्ला केला. कक्ष क्रमांक ७५१ मध्ये हा प्रकार घडला. या हल्ल्यात नानाजी सुकरु निकेसर (६०) आणि देवरु पतरु वासेकर (६१) हे दोन गुराख्यांचा मृत्यू झाला. सोमवारी नागभिड येथे वाघाच्या हल्ल्यात सत्यवान मेश्राम (६५) हा गुराखी मरण पावला. नागभिड येथे टी १५ आणि टी १०३ या दोन वाघांचा वावर आहे. परंतु सत्यवान यांच्यावर हल्ला केलेल्या वाघाबाबत अद्याप नेमकी माहिती वनाधिका-यांनी दिली नाही. चिंचोला येथील हल्ल्यातील वाघाची ओळख पटण्यासाठी कॅमेरे लावले असल्याची माहिती लोणकर यांनी दिली. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community