नववर्षात आणखी दोन Metro मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता; काय आहे सद्यस्थिती ?

85
नववर्षात आणखी दोन Metro मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता; काय आहे सद्यस्थिती ?
नववर्षात आणखी दोन Metro मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता; काय आहे सद्यस्थिती ?

मुंबई महानगरातील वाढती लोकसंख्या पहाता मुंबई लोकलसाठी (Mumbai Local) अनेक पर्याय निर्माण केले जात आहेत. मेट्रोचे जाळेही वेगाने विस्तारले आहे. येत्या पाच वर्षांत ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभे राहणार आहे. सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) आठ मेट्रो (Metro) मार्गिकांची कामे सुरू आहेत. यातील दोन मेट्रो नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

मेट्रो ९ मधील दहिसर पूर्व ते काशीगाव मार्गिका आणि मेट्रो २ बीमधील डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाळे या मार्गिकांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्या २ मार्गिका येत्या वर्षांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतात. मेट्रो ४ आणि मेट्रो ६ या दोन मार्गिकांसाठी कारशेडची जागा अजूनही मिळालेली नाही, तर मेट्रो ९ आणि मेट्रो ५ च्या कारशेड उभारणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – दहिसर ते मीरा-भाईंदर Metro Line – 9 च्या डेपो मार्गात होणार बदल ?; एमएमआरडीएचा मोठ्या आर्थिक बचतीचा दावा)

मेट्रोच्या कामांची काय आहे सद्यस्थिती ?

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६

• मार्गिकेची लांबी – १४.५ किमी
• स्थानके – १३
• कामांची सद्यःस्थिती – ७७ टक्के स्थापत्य काम पूर्ण
• कारशेड – कांजूरमार्ग येथे नियोजित आहे; परंतु जागा अद्याप ताब्यात नाही.

कल्याण ते तळोजा मेट्रो १२

• मार्गिकेची लांबी – २३.७ किमी
• स्थानके – १९
• कामांची सद्यःस्थिती – ४ टक्के काम पूर्ण
• कारशेड – निळजे येथील डेपोच्या जमिनीचे अंशतः अधिग्रहण.

डी.एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी

• मार्गिकेची लांबी – २३.६ किमी
• स्थानके – १९
• कामांची सद्यःस्थिती – ७८ टक्के स्थापत्य कामे
• कारशेड – मंडाळे येथील डेपोचे ९७ टक्के काम पूर्ण

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो ५

• मार्गिकेची लांबी – २४.९ किमी (पहिला टप्पा ११.९ किमी)
• स्थानके १४ (पहिला टप्पा ६ स्थानके)
• कामांची सद्यःस्थिती – पहिल्या टप्प्याचे ९४ टक्के काम पूर्ण
• कारशेड – कशेळी येथील काही जागा मिळणे बाकी.

• वडाळा कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिका

• मार्गिकेची लांबी ३५ किमी
• स्थानके – ३२
• कामांची सद्यःस्थिती – मेट्रो ४ चे ७५ आणि ४ ‘अ’चे ८६ टक्के स्थापत्य काम पूर्ण
• कारशेड मोघरपाडा येथील जागा अजून मिळाली नाही.

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ

• मार्गिकेची लांबी १३.५ किमी
• स्थानके – १०
• कामांची सद्य:स्थिती – मेट्रो ९ चे ९२ टक्के, मेट्रो ७ अचे ४६ टक्के काम पूर्ण
• कारशेड – डोंगरी येथील कारशेडचे काम नुकतेच सुरू (Metro)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.