मुंबई महापालिकेच्या मालाड पी – उत्तर विभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या विभागाचे विभाजन पी -पूर्व व पी- पश्चिम या दोन स्वतंत्र वॉर्डामध्ये करण्याची घोषणा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी फेब्रुवारी महिन्यांमध्ये केली. त्यानंतर एप्रिल महिन्यांपासून या दोन प्रशासकीय विभागांची अंमलबजावणी सुरु होणे अपेक्षित असतानाच आता दोन महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाला याचा विसर पडलेला आहे. आधीच या पी- उत्तर विभागाला कायमस्वरुपी सहायक आयुक्त नसून त्यामध्ये याचे विभाजनही केले जात नसल्याने नक्की प्रशाासनाची मानसिकता काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाला स्वत:च्या घोषणेचा पडला विसर!
मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२च्या अर्थसंकल्प मांडताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मालाडच्या पी- उत्तर विभागाचे विभाजन आता पी- पूर्व व पी -पश्चिम असे विभागात विभाजन केले जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच याची अंमलबजावणी आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून केली जाईल, अशी घोषणा केली होती. या विभागाची लोकसंख्या अधिक असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर या विभागांचे विभाजन हे प्रशासकीय कामाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आणि सुलभ मानले जात आहे. परंतु प्रशासनाने केवळ याची घोषणा केलेली असून त्यानंतर मात्र प्रशासनाला आपल्याच घोषणेचा विसर पडलेला आहे.
(हेही वाचा : मुंबईत कोरोना शिडी चढतोय)
कायमस्वरुपी सहायक आयुक्त मिळत नाही!
मुंबई महापालिकेच्या मालाड पी -उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांना बढती मिळाल्यानंतर हे पद रिक्त आहे. त्यामुळे पी- दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आधीच पी -उत्तर विभागाला कायमस्वरुपी सहायक आयुक्त मिळत नाही. दुसरीकडे याचे विभाजन करून दोन सहायक आयुक्तांवर दोन विभागांची जबाबदारीही सोपवली जात नाही. त्यामुळे ज्या मालाडचे विभाजन दोन प्रशासकीय विभागांमध्ये करण्याची प्रशासनाला गरज वाटत आहे, त्याच प्रशासनाला आज ना कायमस्वरुपी सहायक आयुक्त देता येत, ना दोन स्वतंत्र विभाग करता येत. त्यामुळे मालाड अजून किती दिवस वाऱ्यावर सोडले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या विभागाचे विभाजन मग करा, आधी कायमस्वरुपी सहायक आयुक्त तरी द्या, अशी आर्जवी मागणी विभागातील सर्व पक्षीय नगरसेवकांकडून केली जात आहे
Join Our WhatsApp Community