मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी आणखी दोघांना अटक! 

या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीनने भरलेली कार सापडल्या प्रकरणी एनआयएने आणखी दोघांना अटक केली. संतोष शेलार आणि आनंद जाधव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यामुळे आता या एकूण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ७ इतकी झाली आहे.

२१ जूनपर्यंत पोलिस कोठडी! 

आनंद जाधव याला लातूर येथुन अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांना एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांचा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. विनायक शिंदे याच्यासोबत या दोघांनी मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत टाकल्याचा संशय एनआयएला आहे. या अनुषंगाने एनआयए तपास करीत आहे.

मनसुख हिरेन आणि अंटालिया स्फोटके प्रकरणाचा तपास एकत्र करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी,  सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी  या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले संतोष शेलार आणि आनंद जाधव हे दोघे मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथे राहणारे असून या दोघाना पोलिस निरीक्षक सुनील माने याच्या सांगण्यावरून  या गुन्ह्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तयार करण्यात आले होते.

(हेही वाचा : अरेच्चा! ‘ती’ यादी  राज्यपालांकडेच  सापडली!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here