राज्यात ओमायक्रॉनचा पसारा वाढत असताना बुधवारी उस्मानाबादमध्ये दोन, तर बुलडाण्यात एक नव्या रुग्णाची नोंद झाली. मुंबईतही अजून एका रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. राज्यात आता ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली असली, तरीही २५ रुग्णांवर यशस्वी उपचार कऱण्यात आले आहे. आता राज्यात केवळ ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचारासाठी आठवडाभराचा अवधी लागत आहे. शिवाय या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य किंवा अजिबात लक्षणे आढळून येत नाहीत. बुधवारी ४ नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या जनुकीय चाचणीचे नमुने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. त्यांचा जनुकीय अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून सांगण्यात आले. चारही रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
(हेही वाचा कोविड मृतांचा आकडा तिसऱ्यांदा शून्यावर)
नव्या ४ ओमायक्रॉन रुग्णांबद्दल
- ४ रुग्णांमागे १ स्त्री व ३ पुरुष
- ४ रुग्ण १६ ते ६७ वयोगटातील आहेत
- तिघांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. एकाचे लसीकरण झालेले नाही
- बुलडाणा येथील रुग्णाने दुबईत प्रवास केला होता. मुंबईतील रुग्णाने आयर्लंडमध्ये प्रवास केला होता.
- उस्मानाबादमधील दोघांपैकी एका रुग्णाला सहसंपर्कातून ओमायक्रॉनची बाधा झाली. एका रुग्णाने युनायटेड अरब एमीरेट्स येथील शारजा येथे प्रवास केला होता.
- चारही रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात आहेत