हात प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी! परळच्या ग्लोबल रुग्णालयाचा दावा

144

अपघातात हात गमावलेल्या दोन रुग्णांना दोन मानवी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बसवण्यात आले आहे.  ऑक्टोबर महिन्यात या हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परळ येथील ग्लोबल रुग्णालयात पार पडल्या. या शस्त्रक्रियेला बायलॅटरल हॅण्ड ट्रान्सप्लान्ट असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणारे परळ रुग्णालयातील ग्लोबल रुग्णालय देशातील पहिले रुग्णालय ठरल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला.

ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात राजस्थानातील २२ वर्षांच्या कबड्डी खेळाडूवर, तर महिन्याअखेरीस व्यवसायाने अकाऊंटंट असलेल्या ३३ वर्षांच्या घरातील एकमेव कर्त्या पुरुषावर हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या रुग्णांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अहमदाबादमधून मिळाले राजस्थानातील कबड्डी खेळाडूला हात

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला राजस्थानातील जयदेव सिंग (२२) या कबड्डी खेळाडूला विजेचा धक्का लागला. ज्या दिवशी जयदेव कबड्डी अकादमीत प्रवेश घेणार होता, त्याच दिवशी ही दुर्दौवी घटना घडली. गँगरीनच्या जंतूसंसर्गामुळे त्याच्यावर दोन्ही हातपाय गमावण्याची वेळ आली. मात्र १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथून एका माणसाची हाताची जोडी अवयवदानाच्या माध्यमातून जयदेवला हाताच्या प्रत्यारोपणासाठी मिळाली.

(हेही वाचा देशातील ‘ते’ तिन्ही कृषी कायदे रद्द करणार! पंतप्रधानांची मोठी घोषणा)

सूरतहून मिळाले पुण्यातील घरातल्या एकमेव कमवत्याला हात

पुण्यातील प्रकाश शेलार यांना दोन वर्षांपूर्वी दिवाळीत विजेच्या धक्क्यामुळे हात-पाय गमावण्याची वेळ आली. घरातील एकमेव कमवता पुरुष असल्याने घराची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांच्या शिक्षणासाठी शेलार यांच्या पत्नी आणि आईने लहानसहान कामे करायला सुरुवात केली. ३० ऑक्टोबरला सूरतहून एका व्यक्तीचे अवयवदानाच्या माध्यमातून हाताची जोडी शेलार यांच्यासाठी उपलब्ध होत असल्याचे समजले. शेलार यांच्यावर ग्लोबल रुग्णालयाच्या टीमने लगेचच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

कशी होते हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया?

हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया (बायलॅटरल हॅण्ड ट्रान्सप्लान्ट) दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या असतात. प्राप्तकर्त्या रुग्णाचे अवयव किती प्रमाणात कापले गेले आहेत यानुसार ही गुंतागुंत कमी-जास्त होत असते. हात व पाय दोन्ही गमावलेल्या रुग्णांवर दोन्ही हात बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यामध्ये काही विशिष्ट आणि खडतर आव्हाने असतात, अशी माहिती या दोन्ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. निलेश सातभाई यांनी सांगितले. बहुतेकदा या रुग्णांच्या शारीरिक क्षमता कमकुवत झालेल्या असतात व हातांचे प्रत्यारोपण केल्यानंतर बदललेल्या शारीरिक स्थितीशी जुळवून घेणे त्यांना कठीण जाऊ शकते. मात्र या दोन्ही रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर स्थिती पूर्ववत होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठीच्या प्रयत्नांत डॉक्टरांचे पथक यशस्वी ठरले असल्याचे डॉ. सातभाई म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.