केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक (Pan Card Aadhaar Link) करण्यास दिरंगाई करणाऱ्यांकडून सरकारने जेवढा दंड वसूल केला आहे, त्याची रक्कम पाहूनच भुवया उंचावतील. अशी दिरंगाई करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. आतापर्यंत नागरिकांकडून 2 हजार 125 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यसभेच्या खासदार फुलो देवी नेताम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यांनी 30 जून 2023 पर्यंत किती लोकांनी त्यांचे पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक (Pan Card Aadhaar Link) केले आहे? तसेच, पॅन-आधार नसल्यामुळे किती लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे? या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 30 जूनपर्यंत 54,67,74,649 पॅनकार्ड हे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. कोणतेही पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट करण्यात आलेले नाही. जर आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड फक्त इनऑपरेटिव्ह झाले आहे.
फुलो देवी यांनी सरकारला विचारले की पॅन-आधार लिंक करण्यासाठी किती लोकांनी 1,000 रुपये दिले आहेत आणि सरकारने आतापर्यंत किती रक्कम वसूल केली आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, 1 जुलै 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुमारे 2.1 कोटी लोकांनी एक हजार रुपयांचा दंड भरून पॅन-आधार लिंक केले आहे. मुदतीनंतर आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दंड ठोठावला होता. त्यातून सरकारने 2,125 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community