भंडारा येथील बघेरा गावात बावनघडी प्रकल्पाताली छोट्या कालव्यात दोन दिवसांपूर्वी वीस महिन्यांच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आल्यानंतर, वनविभागाने शनिवारी पाचजणांची चौकशी केली. घटनास्थळापासून तीनशे मीटरजवळील शेतात वन्य प्राण्यांचे अवशेष सापडल्याने दोन जणांना वन कोठडी दिली जात असल्याची माहिती भंडारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली.
काय झाले नेमके?
शुक्रवारी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या वाघाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिका-यांनी नाकारली. वाघाच्या शरीरावरील अवयवही जसेच्या तसे आढळले. मात्र वाघाच्या मागच्या पायाची नखे घासल्यामुळे तुटली होती, त्यात पंजालाही गंभीर जखमा दिसून आल्या. वाघाच्या पुढच्या पायाचा पंजाही जबर घासला गेल्याने रक्तबंबाळ झालेला होता. मात्र वाघ कालव्यात कसा पडला, हे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. या तपासासाठी शनिवारी वनविभागाने पोलिसांसह कालव्या नजीकच्या भागांत तपास केला.
(हेही वाचाः कालव्यात बुडाला वाघ, विदर्भात सलग दुस-या दिवशी वाघाचा मृत्यू)
शेतात वन्यप्राण्याचे अवशेष
एका शेतात वनविभागाला बैलगाडीवर रक्ताचे नमुने आढळले. ही बैलगाडी जप्त करण्यात आली आहे. बैलगाडीतील रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाईल. या प्रकरणी दोन जणांना वनकोठडी दिली जाणार आहे. अन्य तीन जणांचीही याप्रकरणी चौकशी केली जात आहे.
https://twitter.com/HindusthanPostM/status/1510539942665277448?s=20&t=8A6rn8lm3O7zh19f2Sj-ww
कारण नेमके काय?
ज्या भागात वाघाचा मृतदेह आढळला, तो भाग पेंच अभयारण्यातील वाघांचा भ्रमणमार्ग (कॉरिडोर) मानला जातो. या भागात वाघांचा वावर असल्याचे वनाधिका-यांनी, स्थानिकांनी गस्तीदरम्यान पाहिले आहे. त्यामुळे वीस महिन्यांच्या या वाघाने इतर वाघांच्या प्रदेशात प्रवेश केल्याने हद्दीतील वादावरुन दोन वाघांमध्ये झुंज झाली, त्यात वीस महिन्यांच्या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी व्यक्त केला. या प्रकरणी अजूनही तपास सुरु असल्याचे ते म्हणाले.
(हेही वाचाः महाराष्ट्रातील ‘हे’ शहर झाले शुद्ध शाकाहारी)
Join Our WhatsApp Community