दादर चैत्यभूमीवर आजवर कधीही न जाणारे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी सकाळी चैत्यभूमीवर जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन केले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे कधीही चैत्यभूमीच्या दिशेने फिरकलेही नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर राज शिष्टाचारानुसार ते प्रथम चैत्यभूमीवर गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्ष दुभंगल्यानंतर मागील वर्षी आणि यंदा ते चैत्यभूमीवर गेले. आजवर हिंदुत्वाचा मुद्दा घेवून निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करत पक्षांचे नेतृत्व स्विकारल्यानंतर कधीही त्यांना चैत्यभूमीवर जावेसे वाटले नव्हते, परंतु आता पक्ष दुभांगल्यानंतर दलित बांधवांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा खटाटोप का, असा प्रश्न दलित बांधवांच्या मनात उपस्थित होवू लागला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी चैत्यभूमीवर जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आमदार एॅड. अनिल पवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, विभागप्रमुख महेश सावंत, महिला विभाग संघटिका श्रद्धा जाधव यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत युती केली आहे. इंडी आघाडीत शिवसेना उबाठा पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी त्यात नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासह इतर पक्षासोबत आघाडी करत आधीच हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर झालेल्या पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दलितांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे यांचा सुरू आहे. त्यामुळे आधीच दलितांना आपला नेता वाटावा म्हणून उद्धव ठाकरे हे आता चैत्यभूमीवर जात असले तरी ते मनापासून तिथे जात नसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. दलित व्होट बँक जवळ करण्यासाठी हा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीने जर युती नाकारली तर दलित मतदारांना शिवसेना हा पक्ष आपला वाटावा आणि या पक्षाबद्दल त्यांच्यातील कटुता दूर व्हावी म्हणून हा खटाटोप असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते चैत्य भूमीवर का येत नव्हते याचे उत्तर त्यांनी द्यावे. कारण त्यांना दादर व शिवाजी पार्क मधील मते जातील याच भीतीने ते कधीही चैत्यभूमीवर जात नव्हते हे सत्य ते नाकारू शकत नाही असाही प्रश्न राजकीय जाणकारांकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community