राज्यातील उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्यांना उद्योजकांचा यंदापासून सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी उद्योगरत्न, उद्योग मित्र मराठी उद्योजक व महिला उद्योजक असे राज्यस्तरीय पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत. सोमवारी या पुरस्काराची रक्कम आणि स्वरूप जाहीर करण्यात आले. त्यानुसार, उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च उद्योगरत्न पुरस्कार विजेत्यांना २५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र दिले जाणार आहे.
राज्यातील हा पहिला सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ वाजता जिओ सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उद्योग मित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील सह्याद्री समूहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
(हेही वाचा Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने तिरंगा फडकवण्यात मुसलमानांमध्ये लागली चढाओढ)
या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री सांमत यांनी यावेळी दिली.
विजेत्यांना मिळणार इतकी रक्कम
- उद्योगरत्न – २५ लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र
- उद्योग मित्र – १५ लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र
- उत्कृष्ट महिला उद्योजक – ५ लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र
- उत्कृष्ट मराठी उद्योजक – ५ लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र