उल्हास नदीपात्रात बदलापूर गावाजवळील ब्रीजखाली गेल्या काही दिवसांपासून चक्क वाहने धुतली जात आहेत. उल्हास नदीपात्रातून बदलापूर, शहाड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ते ठाण्यापर्यंतच्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तरीही नदीपात्रात वाहने धुण्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेने उघडकीस आणले. उल्हास नदीतील जलप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण संस्थाही काटेकोरपणे या प्रकरणी लक्ष ठेवत नसल्याने वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन डी यांनी आक्षेप नोंदवला. वाढत्या जलप्रदूषणांमुळे नागरिकांना पोटाचे, आतड्याचे विकार तसेच कर्करोग होऊ शकतो. परंतु जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई या प्रकरणावर केलेली नाही.
( हेही वाचा : आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच महिन्यांच्या मुलीचे अपहरण; मुंबई पोलिसांनी असा लावला शोध)
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही नदीपात्रात सोडल्या जाणा-या सांडपाण्याविरोधात लढत आहोत. हेंद्रेपाडा येथील नाल्यातून उल्हास नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. आता दिवसाढवळ्या ट्रक, टॅम्पो, बाईक तसेच रिक्षाही नदीपात्रात उतरवल्या जातात. नदीतील पाण्याने वाहने धुतली जातात. या प्रकारावर कुळगाव-बदलापूर महानगरपालिकेकडून कोणताही आळा बसला नसल्याची तक्रारही स्टॅलिन डी यांनी केली.
उल्हास नदीतील जलप्रदूषणाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जलप्रदूषण विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत सोनटक्के यांनी या प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. उल्हास नदीचे नाव घेताच हा विषय मी पाहत नाही, या वाक्यानेच संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यापूर्वी सोनटक्के यांनी सुरुवात केली. नदीपात्रात वाहने धुतली जातात, याची माहिती दिल्यानंतर सोनटक्के यांनी कल्याण प्रादेशिक अधिका-यांशी याबाबत माहिती घेण्यास सांगितले. उल्हास नदीचा भाग आपण पाहत नसल्याचे धक्कादायक विधानही संपूर्ण राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाविषयी काम करणा-या डॉ. सोनटक्के यांनी केले. गेल्या पाच वर्षांपासून नदीपात्रात स्थानिक महानगरपालिकेकडून सांडपाणी सोडले जात आहे, याबाबत काय कारवाई झाली आहे, याची माहितीही सोनटक्के यांनी दिली नाही. या प्रकरणाचे समन्वयक वेगळे आहेत. सांडपाणी तसेच वाहने धुण्याच्या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात आणून दिल्यानंतर प्रादेशिक अधिका-यांकडून माहिती घेऊन विधान केले जाईल, अशी सबब सोनटक्के यांनी दिली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सोनटक्के यांनी माहिती दिली नाही.
Join Our WhatsApp Community